सनदी बांधकाम सचिवांपुढे तगडी आव्हाने
By Admin | Published: January 6, 2015 12:58 AM2015-01-06T00:58:23+5:302015-01-06T00:58:23+5:30
६० वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात आयएएस सचिवांचे पर्व सुरू झाले आहे. या नव्या सचिवांपुढे रिक्त पदांचा अनुशेष भरणे, अभियंत्यांच्या बढत्या करणे, घोटाळे थांबविणे,
डझनावर समस्या : रिक्त पदांचा अनुशेष, प्रमोशन्स, कामांची गुणवत्ता, पारदर्शकता
यवतमाळ : ६० वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात आयएएस सचिवांचे पर्व सुरू झाले आहे. या नव्या सचिवांपुढे रिक्त पदांचा अनुशेष भरणे, अभियंत्यांच्या बढत्या करणे, घोटाळे थांबविणे, कामांची गुणवत्ता राखणे अशी डझनावर आव्हाने आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याला तांत्रिक सचिव होते. ही सूत्रे आता खास अपर मुख्य सचिवाचे पद निर्माण करून आनंद कुळकर्णी या सनदी अधिकाऱ्याच्या हाती सोपविण्यात आली आहेत. अभियंत्यांच्या रिक्त जागा भरणे, त्यासाठी प्रमोशन्स काढणे हे मुख्य काम त्यांना मिशन म्हणून हाती घ्यावे लागणार आहे. कारण आजच्या घडीला मुख्य अभियंत्यांच्या सात जागा रिक्त आहेत. त्यात नाशिक, औरंगाबाद, विशेष प्रकल्प विभाग मुंबई या प्रमुख आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाला मुख्य अभियंत्यांची दोन पदे मंजूर आहेत. मात्र ही पदे रिक्त आहेत. राज्यातील अधीक्षक अभियंत्यांचा तर कारभारच प्रभारावर सुरू आहे. यवतमाळसह ३२ ठिकाणी अधीक्षक अभियंते नाहीत. कार्यकारी अभियंत्यांची ५० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. अभियंत्यांच्या दोन कॅडरमधील भांडणात गेली पाच वर्षे बढत्या होऊ शकल्या नाहीत. बांधकाम खात्यातील या बढत्या, बदल्या मार्गी लावाव्या, शिवाय कंत्राटांचे डिलिंग, कामांची निकृष्टता, ‘मार्जीन मनी’ यावर आनंद कुळकर्णी यांनी ‘रोलर’ फिरवावा, अशी प्रामाणिक अभियंत्यांची अपेक्षा आहे.
ज्येष्ठतेची फाईल मंत्र्यांच्या टेबलवर
सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंत्यांची १९९० पर्यंतचीच सेवाज्येष्ठता यादी तयारी झाली होती. त्यानंतर ती यादी नियमानुसार तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही ज्येष्ठता यादी तयार करून मंजुरीसाठी बांधकाम मंत्र्यांच्या टेबलवर असल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबईतील ‘प्रेसिडेन्सी डिव्हिजन’मध्ये स्वामीदास चौबे या कार्यकारी अभियंत्याने अवघ्या दीड वर्षात तब्बल ११२ कोटी रुपयांचा घोटाळा केला. मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र सर्व काही थंडबस्त्यात! कुणावरच कारवाई नाही. उलट या घोटाळ्यात सहभागी उपअभियंत्यांना बढती देऊन वरकमाईच्या जागांवर नियुक्त्या दिल्या गेल्या.