नक्षल्यांविरुद्ध जोरदार निदर्शने
By admin | Published: April 9, 2017 02:46 AM2017-04-09T02:46:32+5:302017-04-09T02:46:32+5:30
पोलीस आणि निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांविरुद्ध तसेच त्यांच्या समर्थनार्थ बैठक ...
प्रो. साईबाबा आणि साथीदारांना फाशी द्या : शहिदांच्या कुटुंबीयांची आमदार निवासासमोर घोषणाबाजी
नागपूर : पोलीस आणि निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांविरुद्ध तसेच त्यांच्या समर्थनार्थ बैठक घेणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली - गोंदियातील नक्षल पीडितांनी येथे शनिवारी दुपारी जोरदार निदर्शने केली.
नक्षलवाद्यांची थिंक टँक मानला जाणारा दिल्लीचा प्रो. जी. एन. साईबाबा याला गडचिरोली पोलिसांनी २०१४ ला अटक केली होती. नक्षलवाद्यांनी केलेल्या अनेक हिंसक घटनांमध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा होता. प्रो. साईबाबा आणि त्याच्या तीन साथीदारांना महिनाभरापूर्वी गडचिरोली कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्याच्या समर्थनार्थ आणि शिक्षेचा विरोध करण्यासाठी देशभरातील फ्रंटल आॅर्गनायझेशनची मंडळी शनिवारी नागपुरात बैठक घेणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांमार्फत पोलिसांना कळाली होती.
ही माहिती शहीद पोलिसांच्या तसेच गडचिरोली, गोंदियात नक्षलवाद्यांकडून मारल्या गेलेल्या निरपराध नागरिकांच्या कुटुंबीयांच्या कानावर जाताच ते संतप्त झाले. त्यामुळे गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील मंडळी मोठ्या संख्येत शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचली.
भूमकाल संघटना, नक्षल पीडित परिवार संघटन, शहीद पोलीस कर्मचारी परिवार संघटनांच्या नेतृत्वात पन्नासेक महिला-पुरुष आणि तरुण-तरुणींनी प्रारंभी संविधान चौकात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ठिकठिकाणाहून आलेली मंडळी आमदार निवासात बैठक घेत असल्याचे कळताच शहीद आणि नक्षल पीडित परिवारातील मंडळींनी थेट आमदार निवासासमोर धाव घेतली. तेथे दुपारी २ वाजतापासून ४ वाजेपर्यंत जोरदार निदर्शने केली. दिव्यांग असलेल्या प्रो. साईबाबाने क्रूर नक्षलवाद्यांना केलेली मदत निषेधार्य असून, त्याच्या चिथावणीवरूनच अनेक पोलीस आणि निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रो. साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना फाशी द्या, अशी मागणी निदर्शक करीत होते. अनेकांचे बळी घेण्यास कारणीभूत ठरलेल्यांच्या समर्थनार्थ जी मंडळी बैठका घेत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशीही त्यांची मागणी होती.(प्रतिनिधी)
अन् निर्माण झाला तणाव!
भर उन्हात घोषणाबाजी करणाऱ्या या मंडळीमध्ये कुण्या शहीद पोलिसांची आई, कुणाची पत्नी तर कुणाची बहीण होती. अशाच प्रकारे संबंध नसताना नक्षल्यांकडून मारल्या गेलेल्या परिवारातीलही आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा-मुलगी किंवा अन्य नातेवाईकांचा समावेश होता. दुपारी ४ च्या सुमारास अचानक त्यांनी आमदार निवासात (बैठकस्थानी) शिरण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला. सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निदर्शने करणाऱ्यांना लगेच ताब्यात घेतले. त्यांना पोलीस वाहनातून सीताबर्डी ठाण्यात आणण्यात आले. येथून सायंकाळी ७ वाजता त्यांना मुक्त करण्यात आले.
दरम्यान, शहिदांच्या परिवारातील रिना आणि आणखी काही जणांशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असलेला प्रो. साईबाबा घातक नक्षल्यांना घातपातांसाठी चिथावणी देत होता. त्याचे हे कृत्य प्रोफेसरकीला काळे फासणारे आहे. हे करतानाच तो देशासाठी समृद्ध पिढी घडवत नव्हता तर विद्यार्थ्यांच्या डोक्यात विष पेरून त्यांना देशद्रोही बनविण्याचे कारस्थान करीत होता, असेही ते म्हणाले.