काेराेना रुग्णांना नि:स्वार्थ सेवेचा भक्कम आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:31+5:302021-05-11T04:09:31+5:30
विजय भुते लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : काेराेना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असते. तिथे उपचार घेताना त्या रुग्णांना ...
विजय भुते
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : काेराेना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असते. तिथे उपचार घेताना त्या रुग्णांना एकाकीपणा जाणवताे. त्यांना औषधांसाेबतच मानसिक आधाराचीही गरज असते. पारशिवनी येथील काेविड केअर सेंटरमधील रुग्णांची नि:स्वार्थ सेवा करणारे वैद्यकीय कर्मचारी व तरुण या रुग्णांची देखभाल करण्यासाेबतच त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत असल्याने त्यांचा आपल्याला भक्कम मानसिक आधार असल्याची प्रतिक्रिया काही रुग्णांनी व्यक्त केली.
रुग्णाला त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्रमंडळी मानसिक आधार देतात. काेराेना रुग्ण मात्र कुटुंबीय व मित्रांपासून दूर असतो. त्यांना भेटण्याची परवानगीदेखील कुणाला दिली जात नाही. मग उपचार घेत असताना त्यांच्याशी बाेलणे, चर्चा करणे, मानसिक आधार देणे याही बाबी महत्त्वाच्या असतात. पारशिवनी येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात २६ एप्रिलपासून काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, या सेंटरमध्ये सध्या १५ रुग्ण उपचार घेत आहेत. सेंटर सुरू झाल्यानंतर येथे लगेच मनुष्यबळाची कमतरता जाणवायला लागली.
येथे विद्युत व्यवस्था करणे, बेड लावणे, साहित्य व्यवस्थित ठेवणे, ऑक्सिजन सिलिंडर भरून आणणे, रुग्णाला सेवा देणे, सहकार्य करणे व इतर कामे करायची कुणी, असाही प्रश्न निर्माण झाला. मात्र, ही जबाबदारी पारशिवनी येथील राहुल सायरे, अंकित वाळके, संदीप शिंदे, धर्मेंद्र चौरीवार, संदीप बावनकुळे व गौरवसिंग तोमर या तरुणांनी स्वीकारली. त्यांना यासाठी गौरव पनवेलकर, चेतन देशमुख, विजय भुते, रूपेश खंडारे, रणजित ठाकूर व अमोल कनोजे यांनी प्रेरित केले.
हे सर्व तरुण या सेंटरमध्ये रुग्णांना नि:स्वार्थ सेवा देत असून, ते रुग्णांना वेळेवर औषधी, नाश्ता, चहा, जेवण, पाणी देण्यापासून इतर सर्व कामे करतात. एवढेच नव्हे, तर ते रुग्णांशी चर्चा करून त्यांना मानसिक बळदेखील देतात. ही मंडळी डॉ. तारिक अन्सारी, डॉ. भूषण कावळे, नर्स नंदा वरठी, उषा चव्हाण व इतर कर्मचाऱ्यांनाही मदत करतात. त्यामुळे आपण घर व कुटुंबीयांपासून दूर असलाे तरी एकाकीपणा जाणवत नाही, अशी प्रतिक्रिया येथील रुग्णांनी व्यक्त केली.
...
गरीब रुग्णांची साेय
या काेविड केअर सेंटरमुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधव व गरीब रुग्णांची साेय झाली आहे. पूर्वी पारशिवनी शहरासह तालुक्यातील काेराेना रुग्णांना उपचारासाठी नागपूरला न्यावे लागायचे. तिथे शासकीय रुग्णालयात बेड न मिळाल्यास माेठी गैरसाेय व्हायची. उपचाराअभावी काहींचा मृत्यूही झाला आहे. रणजित ठाकूर हा रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी प्रसिद्ध असून, संदीप नक्षूलवार याने हॅबिटेट फॉर ह्युमिनिटी इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कोविड सेंटरमध्ये बेड, सॅनिटायझर व साहित्य पुरवठ्याची कामे केली आहेत.