नागपुरात मान्सूनचे दमदार आगमन, तीन दिवसात ९६ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:31 PM2021-06-12T23:31:50+5:302021-06-12T23:32:15+5:30
Strong monsoon arrives मान्सूनचे नागपुरात अगदी वेळेवर आणि दमदारपणे आगमन झाले आहे. यातीन दिवसातच नागपूर शहरात ९६ मिमी पावसाची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मान्सूनचे नागपुरात अगदी वेळेवर आणि दमदारपणे आगमन झाले आहे. यातीन दिवसातच नागपूर शहरात ९६ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ६४.४ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर आकाशात ढग होते. मात्र पाऊस झाला नाही. असे असले तरी पुढील तीन दिवसात नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. विशेषत: मध्य भारतात मान्सुनी ढग अधिक प्रमाणात राहतील. नागपुरात जून महिन्यामध्ये साधारणत: १७५ ते १८० मिमी पाऊस पडतो. मात्र प्रारंभाच्या पहिल्या तीन दिवसातच ५० टक्के पाऊस पडला.
आरेंज अलर्ट यलोमध्ये बदलला
नागपूरसह विदर्भातील बहुतेक भागात १५ जूनपर्यंत आरेंज अलर्टची घोषणा करण्यात आली होती. मात्र या दोन दिवसात पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. यामुळेच हवामान विभागाने शनिवारी आरेंज अलर्टला यलो अलर्टमध्ये परावर्तीत केले.
तापमानाचा आलेख खालावला
नागपुरात मागील तीन दिवसात वातावरणाचा रंग बदलला. यामुळे कमाल तापमान सामान्यापेक्षा १० अंशाने खालावून २९.४ वर घसरले आहे. तर, किमान तापमानही सामान्यापेक्षा ६ अंशाने कमी होऊन २१.३ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. २४ तासात दिवसाचे आणि रात्रीचे तापमान क्रमश: १.७ आणि ०.८ अंश सेल्सिअसने खालावले. सकाळी जोराचा पाऊस येण्यासारखे वातावरण होते. आर्द्रता ९८ टक्के होती. पण तुरळक पाऊस आला.