दहावी आणि बारावीच्या निकालासाठी धडपड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 08:44 PM2020-05-06T20:44:02+5:302020-05-06T20:46:30+5:30
कोरोनाच्या संक्रमणामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडतो आहे. शिक्षकांना उत्तर पत्रिका ने-आण करण्यात अडचण जात आहे. या कामासाठी शिथिलता देण्यात यावी, म्हणून नागपूर बोर्डाच्या सचिवांनी सहाही विभागातील जिल्हाधिकारी व नागपूर व चंद्रपूर महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून विनंती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडतो आहे. शिक्षकांना उत्तर पत्रिका ने-आण करण्यात अडचण जात आहे. या कामासाठी शिथिलता देण्यात यावी, म्हणून नागपूर बोर्डाच्या सचिवांनी सहाही विभागातील जिल्हाधिकारी व नागपूर व चंद्रपूर महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून विनंती केली आहे. दहावी व बारावीचा निकाल १० जून पूर्वी घोषित करणे आवश्यक आहे. पण लॉकडाऊनमुळे अजूनही तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे आलेल्या नाही. बोर्डाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सूट अथवा प्रवासाकरिता परवानगी पास देण्यात यावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावरून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात पाठविणे, शिक्षक अथवा शिपायांमार्फत उत्तर पत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे, परीक्षकांकडून नियामकाकडे उत्तर पत्रिका पोहचविणे. नियामकाकडील उत्तर पत्रिका विभागीय मंडळाकडे जमा करणे तसेच परीक्षेतील गैरमार्ग प्रकरणी चौकशी करण्याकरिता परीक्षा मंडळाच्या नियुक्ती अधिकाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी देणे, या मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहे.