व्यंगचित्रातून चितारला समतेचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:24 PM2018-04-13T23:24:29+5:302018-04-13T23:24:39+5:30

व्यंगचित्र ही दुधारी तलवार आहे. आडव्या-तिरप्या रेषांची ही कला शतकानुशतकाचा विद्रोह एका क्षणात तितक्याच तिव्रतेने मांडत असते़ म्हणूनच संजय मोरे या कल्पक कलावंताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीअंताचा विद्रोह कुंचल्यातून रेखाटण्यासाठी व्यंगचित्रांची ही दुधारी तलवारच निवडली आणि पुरातनवाद्यांचे फसवे बुरखे टराटर फाडून टाकले़ त्याच संजय मोरेंच्या या अपारंपरिक कलेचा हा लेखाजोखा खास बाबासाहेबांच्या जयंतीदिनी़

The struggle of the colored equality from the cartoon | व्यंगचित्रातून चितारला समतेचा संघर्ष

व्यंगचित्रातून चितारला समतेचा संघर्ष

googlenewsNext
ठळक मुद्देपहिलाच धाडसी प्रयोग : संजय मोरे यांनी कुंचल्यातून उलगडले बाबासाहेब

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यंगचित्र ही दुधारी तलवार आहे. आडव्या-तिरप्या रेषांची ही कला शतकानुशतकाचा विद्रोह एका क्षणात तितक्याच तिव्रतेने मांडत असते़ म्हणूनच संजय मोरे या कल्पक कलावंताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीअंताचा विद्रोह कुंचल्यातून रेखाटण्यासाठी व्यंगचित्रांची ही दुधारी तलवारच निवडली आणि पुरातनवाद्यांचे फसवे बुरखे टराटर फाडून टाकले़ त्याच संजय मोरेंच्या या अपारंपरिक कलेचा हा लेखाजोखा खास बाबासाहेबांच्या जयंतीदिनी़
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू हे विपुल साहित्यातून, चित्रपटांतून, नाटकांतून, महानाट्यांतून, गाण्यांतून, पोवाड्यांतून, पथनाट्यांतून, चित्रांतून उलगडले गेले. परंतु व्यंगचित्रातून ते कधीच सामोर आलेले नव्हते. ते धाडस मोरे यांनी केले. विसंगती हा व्यंगचित्राचा आत्मा आहे, असे असले तरी व्यंगचित्रातून काव्यात्म आशय, सार्वकालिक सत्य समर्थपणे त्यांनी चितारले आहे. बाबासाहेबांच्या कार्याचा आधार घेऊन राजकारणी त्याचा कसा विपर्यास करतात याचाही त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून सडेतोड साकारले. आतापर्यंत ७० व्यंगचित्रे त्यांनी पूर्ण केली आहेत. यात आणखी ३० चित्रांची भर पडणार आहे. नंतर या चित्रांचे प्रदर्शन भारतातच नव्हे तर विदेशातही भरविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
मोहननगर येथील सेंट जॉन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांकडून कलेचे धडे गिरविणारे मोरे गेल्या दीड वर्षांपासून ही व्यंगचित्रे रेखाटत आहेत. व्यंगचित्र काढणे तसे धाडसाचे असले तरी मी माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मोरे यांचे शालेय शिक्षण अकोल्यामध्ये पूर्ण झाले. नंतर नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. व्यंगचित्राची आवड त्यांंना लहानपणापासूनच होती. परंतु कुठल्या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. ‘बीएफए’ला असताना तरुणांसाठी आयोजित केलेल्या व्यंगचित्र स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. मित्रांकडून सामानाची जुळवाजुळव करीत व्यंगचित्र काढले आणि त्या चित्राला प्रथम पुरस्कार मिळाला. तेव्हापासून त्यांना व्यंगचित्राची ओढच लागली. राष्ट्रीय स्तरावरील आयोजित ‘व्यंगचित्र’ स्पर्धेत सहभागी होत दोनदा सुवर्णपदक तर एकदा रौप्यपदक पटकाविले. आंतरराष्ट्रीय व्यंग चित्रकला स्पर्धेतही त्यांनी आपला ठसा उमटाविला. लालित्य फाऊंडेशनतर्फे नागपुरात आयोजित व्यंग चित्रकला स्पर्धेत ३६ देशांहून व्यंगचित्रे आली होती. यात मोरे यांचेही चित्र होते. त्यांच्या चित्राला प्रथम पुरस्कार मिळाला. चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेतही त्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. पुरस्कार मिळत होते, परंतु त्यांचे समाधान होत नव्हते. एकदा कळत-नकळत बाबासाहेबांनी प्रहार केलेल्या विषमतेवर आधारित व्यंगचित्र रेखाटले. त्या चित्राने त्यांची झोपच उडवली. बाबासाहेबांचे जीवनकार्य व्यंगचित्रातून सकारात्मक दृष्टीने मांडत जातीव्यवस्था, गुलामगिरी, निरक्षरता, असमानता, महिलांचे शोषण, बालमजुरीला कमीत कमी शब्दात व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी अभिव्यक्त केले.
दीड वर्षांत ७० चित्रे रेखाटली. डिसेंबर २०१८ पर्यंत १०० व्यंगचित्र पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यानंतर व्यंगचित्रांचा हा संग्रह देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे आणि विदेशातही त्याचे प्रदर्शन भरविण्याचे स्वप्न आहे. या व्यंगचित्रांना घेऊन आंबेडकरी जनतेमध्ये उत्सुकता आहे. यामुळे महाराष्ट्रच नाही तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात, हरियाणा येथील विविध सामाजिक संघटनांकडून या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याची मागणी होऊ लागली आहे.
‘लोकमत’शी बोलताना मोरे म्हणाले, बाबासाहेबांचे कार्य, त्यांनी केलेली सामाजिक सुधारणा, त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन हे विविध माध्यमातून समोर आले. परंतु व्यंग चित्रातून प्रथमच बाबासाहेबांच्या सृजनशीलतेचे सामर्थ्य सामोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. बाबांच्या ठळक घटनांना स्पर्श करण्यासाठी मला माझ्या कलेचा वापर करता आला, याचा सार्थ अभिमान आहे.

Web Title: The struggle of the colored equality from the cartoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.