आयुष्यातील संघर्षाने भीती संपली : बबिता ताडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 08:20 PM2019-10-07T20:20:46+5:302019-10-07T20:22:26+5:30
आयुष्यातील संघर्षातूनच आपली भीती संपली; असे सांगत ती तुम्हीही संपवा, असा संदेश करोडपती ठरलेल्या अंजनगाव सुर्जीच्या बबिता ताडे यांनी महिलांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केबीसीच्या हॉट सीटवर बसल्यावर भीती वाटली नाही का, असा प्रश्न आपणास अनेकांकडून विचारण्यात येतो. खरे तर आपल्या आयुष्यात संघर्षाचे प्रसंग अनेकदा आले. सहजासहजी काहीच मिळाले नाही. त्यावेळी भ्यायले असते तर आज हा सन्मान मिळाला नसता. आयुष्यातील संघर्षातूनच आपली भीती संपली; असे सांगत ती तुम्हीही संपवा, असा संदेश करोडपती ठरलेल्या अंजनगाव सुर्जीच्या बबिता ताडे यांनी महिलांना दिला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर केंद्राकडून सोमवारी बाबूराव धनवटे सभागृहात त्यांचा सत्कार करून स्त्री कर्तृत्वाला सलाम करण्यात आला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते. नागपूर लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सुभाष ताडे, वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीष गांधी, मेघे ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका आभा मेघे, लिज्जत पापड ग्रुपच्या शालन आमले होत्या.
सत्काराला उत्तर देताना बबिता ताडे यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव आणि अडचणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, अडचणीचा कधीच बाऊ केला नाही. वयाच्या दहाव्या वर्षापासून वडिलांसोबत रेस्ट हाऊसवर काम केले. ऑफ पिरेडमध्ये आणि वेळ मिळेल तसा अभ्यास करून होमवर्क पूर्ण केले. डोंगरवाटेतून सायकलने प्रवास केला. बारावीमध्ये पेपर नीट सोडवूनही नापास झाले. मात्र जिद्द सोडली नाही. लग्नाआधी वडिलांनी आणि नंतर पतीने पूर्ण साथ दिली. त्यांनी आपल्या प्रगतीचा मार्ग कधीच अडवला नाही. शिका, मुलांना घडवा. ध्येय ठरविले तर आपोआप यश मिळते, असा संदेश त्यांनी दिला.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, हा सावित्रीच्या लेकीचा सन्मान आहे. सावित्रीबाईंनी रुढींची कुलूपं तोडली नसती तर बबिताचा सन्मान झाला नसता. एका बबिताचा आज सत्कार करावा लागणे हा आमच्या मानसिकतेचा पराभव आहे. घराघरात, पावलापावलांवर अशा अनेक बबिता आहेत, मात्र आम्ही त्यांना वाव दिला नाही. दडपून ठेवले. हा आमचा दोष आहे. बबिताचा सत्कार म्हणजे उपेक्षेतून झालेला मुक्तीचा सत्कार आहे. ती जोपर्यंत एकाकी असेल तोपर्यंत आमच्या पराजित मानसिकतेचे दर्शन घडतच राहणार आहे. त्यामुळे हा सन्मान प्रत्येक बबितांच्या वाट्याला येऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून बबिता ताडे यांचा सत्कार करताना सुरेश द्वादशीवार, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. गिरीष गांधी, शालन आमले, रेखा घिये-दंडिगे आदी.