जगण्यासाठी संघर्ष :चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सानिकाची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 09:59 PM2018-07-19T21:59:03+5:302018-07-19T22:00:37+5:30
माथेफिरू युवकाने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका थूगावकर या तरुणीवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तिच्यावर डायलिसीस सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या उपचारात आतापर्यंत मोठा खर्च झाला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले तिचे वडील प्रदीप थूगावकर यांना उपचाराचा खर्च झेपत नसल्याने मुलीला जगवावे तरी कसे या चिंतेने ग्रासले आहे. आर्थिक अडचणीसमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे. या कुटुंबाला संवेदनशील समाजाच्या भरीव आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माथेफिरू युवकाने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका थूगावकर या तरुणीवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तिच्यावर डायलिसीस सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या उपचारात आतापर्यंत मोठा खर्च झाला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले तिचे वडील प्रदीप थूगावकर यांना उपचाराचा खर्च झेपत नसल्याने मुलीला जगवावे तरी कसे या चिंतेने ग्रासले आहे. आर्थिक अडचणीसमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे. या कुटुंबाला संवेदनशील समाजाच्या भरीव आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) हिच्यावर १ जुलै रोजी माथेफिरू युवकाने चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. सानिकाला तातडीने आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया केली. मूत्रपिंड निकामी झाल्याने तिला डायलिसीस सुरू केले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरमधून कृत्रिम श्वास दिला जात आहे. तिची प्रकृती अद्यापही गंभीर असलीतरी ती उपचारात मदत करीत असल्याने पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णालयाचा व उपचाराचा रोजचा खर्च हजारो रुपयांचा आहे. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले तिच्या वडिलांनी उधार-उसनवारी घेऊन हा खर्च पेलला. परंतु आता हा खर्च झेपत नसल्याने हे कुटुंब अडचणीत आले आहे. पैशाअभावी सानिकावरील उपचार थांबण्याची शक्यता आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास सानिका वाचेल, ही एकमेव आशा आहे. या कुटुंबाच्या वतीने सहयोग ट्रस्ट या समाजसेवी संघटनेने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
हवे मदतीचे बळ
थूगावकर कुटुंबाला समाजाच्या आर्थिक मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. प्रदीप थूगावकर यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी खामला येथील पंजाब नॅशनल बँक, खाता क्रमांक १४७२०००१००११३२८० यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. याचा आयएफसी कोड क्र. पीयुएनबी ०१४७२०० आहे. ट्रस्टच्या समन्वयक अॅड. स्मिता सरादे सिंगलकर यांनी थूगावकर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून मदत करण्याचे आवाहन केले आहे.