एसटीचा ७६ वा वर्धापन दिवस थाटामाटात साजरा; लालपरी आली सजूनधजून
By नरेश डोंगरे | Published: June 2, 2024 05:33 PM2024-06-02T17:33:47+5:302024-06-02T17:33:57+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर एसटीचा ७६ वा वर्धापन दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नरेश डोंगरे
नागपूर- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर एसटीचा ७६ वा वर्धापन दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सजून धजून फलाटावर आलेल्या एसटी बसचे अर्थात लालपरीचे औक्षण करून अधिकाऱ्यांनी तिला टिळा लावला. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना पेढे तसेच पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
शनिवारी सकाळी श्रीकांत गभणे प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर, अमरावती यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी गणेशपेठ बसस्थानक आणि परिसराला चांगले सुशोभित करण्यात आले होते. परिसरात रांगोळ्या काढून आंब्याची व फुलांची तोरणे बांधण्यात आली. केळीची खांबं लाऊन बसस्थानक सुशोभित करण्यात आले. प्रवाशांच्या उपस्थितीत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून उपस्थित सर्व चालक वाहकाचे अभिनंदन केले. त्यांना आणि प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विभाग नियंत्रक विनोद चवरे, अविनाश राजगुरे (यंत्र अभियंता) तसेच विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे, आगार व्यवस्थापक गणेशपेठ गौतम शेंडे, आगार व्यवस्थापक घाट रोड अभय बोबडे, स्वाती तांबे इमामवाडा, ललिता भोयर वर्धमान नगर, विलास पाध्ये, सुरेंद्र वाघधरे, भारती कोसरे, शैलेंद्र भारती, श्रद्धा वानखेडे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येत प्रवासी उपस्थित होते.