एसटीच्या ई बसेसना नागपूरचा मार्ग गवसेना; नुसतीच चर्चा, चार्जिंग स्टेशनचाच पत्ता नाही
By नरेश डोंगरे | Published: January 11, 2024 05:37 PM2024-01-11T17:37:53+5:302024-01-11T17:38:03+5:30
राज्यात सध्या मुंबई, पुणे, नाशिक, नगर, संभाजीनगर मार्गावर एसटीच्या ई बसेस धावत आहेत.
नागपूर : शहर उपराजधानीचे, रस्ते चकाचक, मेट्रोसह विविध सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बसचा पत्ता नाही. अद्याप चार्जिंग स्टेशनही तयार झालेले नाही. केवळ ई बसेस येणार म्हणून एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी नुसतीच सहा महिन्यांपासून चर्चा करीत आहेत.
राज्यात सध्या मुंबई, पुणे, नाशिक, नगर, संभाजीनगर मार्गावर एसटीच्या ई बसेस धावत आहेत. राज्याची उपराजधानी आणि विदर्भातील सर्वात मोठे शहर असलेल्या नागपूरलाही एसटीच्या ६५ इलेक्ट्रिक बसेस मिळणार असल्याचे अनेक महिन्यांपूर्वी जाहीर झाले होते. त्यासाठी नागपूर विभागात ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी जागा शोधण्याचे काम सुरू करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले होते. मात्र, चार सहा महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप एसटीच्या ई बसेस नागपूरकडे आल्या नाहीत. बसेस सोडा त्यांच्या चार्जिंग स्टेशनचीही अजून विभागात निर्मिती झालेली नाही. विभागातील इतर ठिकाणे दूर, नागपूर शहरातही चार्जिंग स्टेशनची अद्याप उभारणी झालेली नाही.
संबंधित सूत्रांच्या मते महिन्याभरापूर्वी इमामवाड्यात चार्जिंग स्टेशनची जागा निश्चित करण्यात आली होती. त्यासंबंधाने कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करून वरिष्ठांना कळविण्यात आले. तेथे हॉटलाइन आणण्याचे कामही टप्प्यात आहे. मात्र, त्यानंतर निविदा आणि अन्य प्रक्रिया रखडल्यासारखी झाली आहे. चार्जिंग पॉइंटसाठी आवश्यक इमारत बांधण्याचे कामही थंडबस्त्यात आहे. ते पूर्ण कधी होणार, हे येथील अधिकाऱ्यांना माहिती नाही. केवळ वरिष्ठांकडून निर्णय घेतला जात असल्याने 'काम सुरू आहे' एवढेच उत्तर हे अधिकारी देतात.
कशासाठी रखडले, माहितीच नाही !
ई बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले, ते कधी सुरू होणार, कधी पूर्ण होणार त्याबद्दल काहीही स्पष्ट नाही. चार्जिंग स्टेशन शिवाय ई बसेसचे संचालन शक्य नाही. येथे चार्जिंगचीच सुविधा उपलब्ध नसल्याने आणि ती कधी उपलब्ध होईल, त्याचीही निश्चिती नसल्याने एसटी महामंडळाच्या ई बसेससाठी नागपूर विभागाचा मार्ग अजून बराच दूर असल्याचे सांगितले जाते.