‘रेलनीर’च्या धर्तीवर स्थानकांत अवतरले एसटीचे ‘नाथजल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 07:45 AM2022-02-18T07:45:00+5:302022-02-18T07:45:01+5:30
Nagpur News प्रवाशांना शुद्ध जल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेच्या धर्तीवर एसटीदेखील आता ‘नाथजल’ विकणार आहे.
विशाल महाकाळकर
नागपूर : मागील अनेक आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने राज्य परिवहन महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी व प्रवाशांना शुद्ध जल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेच्या धर्तीवर एसटीदेखील आता ‘नाथजल’ विकणार आहे. यासंदर्भात २०२० मध्ये घोषणा झाली होती व आता प्रत्यक्ष स्थानकांत हे पॅकबंद पाणी उपलब्ध झाले आहे. मागील दोन दिवसांपासून नागपूर एसटी स्थानकावर याच्या विक्रीला सुरुवात झाली आहे.
एसटीच्या आगारातील कॅन्टीनमध्ये ‘नाथजल’ विक्रीसाठी वितरकांची नियुक्ती केली आहे. पुण्याच्या एका कंपनीसोबत महामंडळाचा करार झाला असून पाण्याच्या बाटलीवर महामंडळाचा लोगो लावण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एसटीच्या सर्व आगारात ‘नाथजल’चे वितरक नियुक्त केले आहेत. पुरवठा, विक्री व स्टॉकची माहिती आगार प्रमुखांना ठेवावी लागणार आहे. कालांतराने आगारातील कॅन्टीनमधून इतर कंपन्यांचे मिनरल वॉटर बंद होणार आहे.
- महामंडळाला मिळणार उत्पन्न?
महामंडळाने आपल्या आगारात नाथजल विक्रीला परवानगी दिली आहे. महामंडळाचा लोगो बाटलीवर असल्याने महामंडळाला त्यातून उत्पन्न मिळेल असे सांगितले जात आहे. परंतु नेमका किती मोबदला मिळेल याबाबत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले नाही. पण दोन दिवसांपासून आगारात नाथजल विक्रीला सुरुवात झाली आहे.