एसटीची स्वेच्छानिवृत्ती योजना अन्यायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:08+5:302020-12-15T04:25:08+5:30
नागपूर : एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. यात ५० वर्षे व त्यावरील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीची जितकी वर्षे ...
नागपूर : एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. यात ५० वर्षे व त्यावरील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीची जितकी वर्षे शिल्लक असतील त्या प्रत्येक वर्षासाठी केवळ तीन महिन्यांचेच वेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना अन्यायकारक असून यातील अटीत बदल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
एसटीच्या ज्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे, त्यांंच्यासाठी एसटी महामंडळाने स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. यात कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या मोबदल्यात केवळ तीन महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे. हा कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात असंतोष पसरला आहे. किमान स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची जितकी वर्षे शिल्लक असतील त्यासाठी प्रत्येक वर्षाला आठ महिन्यांचे वेतन द्यावे आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला एसटीत नोकरी द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. स्वेच्छानिवृत्तीची योजना हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी एसटीतील संघटनांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेणे गरजेचे होते. त्यामुळे महामंडळाच्या प्रशासनाने संघटनांना विश्वासात न घेता ही योजना जाहीर केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून या योजनेत बदल करण्याची मागणी कर्मचारी आणि संघटना करीत आहेत.
प्रत्येक वर्षाला आठ महिन्यांचे वेतन द्यावे
‘ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या उमेदीचा काळ महामंडळासाठी दिला त्यांना स्वेच्छानिवृत्ती देताना केवळ तीन महिन्यांचे वेतन देणे चुकीचे आहे. त्यामुळे महामंडळाची ही योजना फसवी आहे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिल्लक असलेल्या वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला आठ महिन्यांचे वेतन आणि वारसास नोकरी देण्याची गरज आहे.’
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)