विद्यार्थ्याला मारहाण : अखेर संस्थाचालकाच्या मुलावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:40 AM2018-11-14T01:40:05+5:302018-11-14T01:40:56+5:30
विद्यार्थ्यांनी केलेल्या खोडीवरून शिक्षकांनी नव्हे तर संस्थाचालकाच्या मुलाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीनंतर सोमवारी कामठी पोलीस ठाण्यात संस्थाचालकाच्या मुलावर बाल हक्क अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांनी केलेल्या खोडीवरून शिक्षकांनी नव्हे तर संस्थाचालकाच्या मुलाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीनंतर सोमवारी कामठी पोलीस ठाण्यात संस्थाचालकाच्या मुलावर बाल हक्क अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना भिलगाव येथील इंडियन आॅलिम्पियाड स्कूलमधील आहे. ११ आॅक्टोबर रोजी संस्थाचालकाचा मुलगा दानिश खान याने ९ व्या वर्गात शिकणाऱ्या मिर्झा आसिफ बेग याला संस्थाचालक व प्राचार्यापुढे बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात दानिश खान याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आरटीई अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. या प्रकरणाची गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती कामठी, केंद्रप्रमुख पं.स. कामठी, शिक्षण विस्तार अधिकारी रेखा चुंगडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्याकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत विद्यार्थी व प्राचार्य यांच्या बयानावरून विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. प्राचार्य यांनी आपल्या बयानात या शाळेत मी केवळ सही करण्यापुरता प्राचार्य आहे, असे स्पष्ट केले. या चौकशीत ही शाळा आरटीई अॅक्टच्या नियमांचे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दानिश खान याच्यावर बाल हक्क अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.