‘नीट’मध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 09:35 PM2023-06-14T21:35:09+5:302023-06-14T21:35:33+5:30

Nagpur News वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

Student commits suicide due to low marks in 'NEET' | ‘नीट’मध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

‘नीट’मध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

googlenewsNext

नागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तो मागील सहा महिन्यांपासून नागपुरात राहून ‘नीट’ची तयारी करत होता. त्याच्या मृत्यूमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

भावेश तेजुसिंह राठोड (१९) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट येथील निवासी आहे. डॉक्टर व्हायचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो दहावीपासूनच तयारीला लागला होता. नागपुरात आणखी चांगली तयारी करता येईल या उद्देशाने तो येथे आला व शिवसुंदर नगर येथे एका नातेवाइकाच्या घरी राहून कोचिंग क्लासमध्ये जात अभ्यास करू लागला. ‘नीट’साठी त्याने पूर्ण जोर लावला होता.

मंगळवारी त्याचा निकाल लागला व त्यात त्याला अपेक्षेनुरूप गुण मिळाले नाही. डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगणार या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने रात्री ११ वाजेनंतर आपल्या खोलीतील सिलिंगला दोरीने गळफास लावला. सकाळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. भावेशने गळफास घेण्याअगोदर इंग्रजीत सुसाइड नोट लिहिली होती. त्यात त्याने आई-वडिलांची क्षमा मागून आत्महत्या करत असल्याचे लिहिले. त्याच्या आई- वडिलांना त्वरित ही माहिती देण्यात आली. एकुलत्या एका मुलाचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मित्रपरिवारातदेखील शोककळा आहे. वाठोडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Student commits suicide due to low marks in 'NEET'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू