मोबाईल दिला नाही म्हणून नागपुरात विद्यार्थिनीचा आत्मघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 09:31 PM2021-05-02T21:31:55+5:302021-05-02T21:32:33+5:30
Nagpur News जेवण केल्याशिवाय मोबाईल मिळणार नाही, असे आईने ठणकावून सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संस्कृता चंद्रशेखर सिंग (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेवण केल्याशिवाय मोबाईल मिळणार नाही, असे आईने ठणकावून सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संस्कृता चंद्रशेखर सिंग (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधणीच्या वाघोबानगरात राहत होती.
संस्कृताचे वडील रेल्वेत असून आई गृहिणी आहे. तिला एक भाऊ आहे. ती नववीत शिकत होती. अलीकडे ऑनलाईन क्लासच्या बहाण्याने ती सारखी मोबाईलमध्ये गुंतून जायची. २४ एप्रिलला सकाळपासून ती मोबाईल घेऊन बसली. सायंकाळी सहा वाजता आईने तिला हटकले. मोबाईल ताब्यात घेऊन आधी जेवण करण्यास सांगितले. जेवण केल्याशिवाय मोबाईल मिळणार नाही, असेही सांगितले. हट्ट मांडूनही आईने मोबाईल दिला नाही;. त्यामुळे ती रागावली आणि बाजूच्या खोलीमध्ये गेली. तेथे तिने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आईने आरडाओरड करून आजूबाजूच्यांना गोळा केले. तिला खाली उतरवून धंतोलीतील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे पाच दिवस उपचार केल्यानंतर गुरुवारी (दि. २९) सकाळी डॉक्टरांनी संस्कृताला मृत घोषित केले. धंतोली पोलिसांनी या प्रकरणाची माहिती शनिवारी माणकापूर पोलिसांना कळविली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
चार दिवसांत तिसरी आत्महत्या
चार दिवसांत विद्यार्थ्यांनी केलेली ही तिसरी आत्महत्या आहे. चार दिवसांपूर्वी माणकापूर तसेच हुडकेश्वरमधील दोन विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
---