विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू : पोहण्याचा मोह अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:28 PM2019-08-28T23:28:42+5:302019-08-28T23:30:20+5:30

पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदागोमुख शिवारात बुधवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

Student drowning in a field: Swimming temptations | विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू : पोहण्याचा मोह अंगलट

विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू : पोहण्याचा मोह अंगलट

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (नांदागोमुख) : पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदागोमुख शिवारात बुधवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
मंथन भोजराज उईके (१३, रा. नांदागोमुख, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नांदागामुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होता. मंथन व त्याचा चुलत भाऊ साहील उईके (१२) नांदागोमुख शिवारातील रामू सातपुते यांच्या शेताजवळ असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, मंथनला पोहता येत नव्हते. दोघेही पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले. काही वेळातच मंथन शेततळ्यातील चिखलात फसला. त्यामुळे त्याने आरडाओरड करायला सुरुवात केली.
या प्रकारामुळे साहील घाबरला व पाण्याबाहेर निघाला. त्यावेळी शिवारात फारसे कुणी नसल्याने मंथनच्या मदतीला कुणीही धावून गेले नाही. परिणामी, शेततळ्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सूचना मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मंथनचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती. या प्रकरणी केळवद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Student drowning in a field: Swimming temptations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.