विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
By admin | Published: May 17, 2017 02:19 AM2017-05-17T02:19:47+5:302017-05-17T02:19:47+5:30
पोहणे येत नसतानाही पोहण्याचा मोह अनावर झाल्याने मित्रासोबत जलाशयात उतरलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.
पोहण्याचा मोह अंगलट : खिंडसी जलाशयातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पोहणे येत नसतानाही पोहण्याचा मोह अनावर झाल्याने मित्रासोबत जलाशयात उतरलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील खिंडसी जलाशयातील नळ योजनेच्या ‘जॅकवेल’जवळ मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. स्थानिक मासेमाऱ्यांनी दोन तास शोधमोहीत राबवून फराजचा मृतदेह बाहेर काढला.
फराज मोहम्मद कुरेशी (१८, रा. शीतलवाडी, रामटेक) असे मृत तरुणाचे नाव आहे. फराज हा रामटेक येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा (विज्ञान शाखा) विद्यार्थी होता. हल्ली खिंडसी जलाशयात पोहणाऱ्यांची गर्दी आहे. फराजही गेल्या तीन दिवसांपासून रोज सकाळी मित्रांसोबत खिंडसी जलाशयात पोहण्यासाठी जायचा. पोहणे येत नसल्याने तो शिकण्याचा प्रयत्न करीत होता.
फराज मंगळवारी सकाळी त्याचा वर्गमित्र आदित्य दिलीप भुतखेडे (१८, रा. रामटेक) याच्यासोबत खिंडसी जलाशयात पोहायला गेला होता. दोघेही जलाशयातील नळ योजनेच्या ‘जॅकवेल’जवळ पाण्यात
उतरले.
फराज अंदाजे पाच फूट आत जाताच त्याला खोलीचा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच आदित्यने लगेच आरडाओरड केली. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. फराज आदित्यच्या डोळ्यादेखत बुडाला.
आदित्यने लगेच मोबाईलवरून या घटनेची माहिती फराजच्या कुटुंबीयांना दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांसह पोलीस व मासेमारी घटनास्थळी दाखल झाले. मासेमाऱ्यांनी दोन तासात फराजचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दुपारी ३ नंतर त्याच्या पार्थिवावर स्थानिक कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोहण्यास
प्रतिबंध घालावा
खिंडसी जलाशयात पोहणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. यात लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा समावेश आहे. या जलाशयात बुडून आजवर अनेकांचा मृत्यू झाला. वारंवार घडणाऱ्या या घटना विचारात घेता, सिंचन विभागाने या जलाशयात पोहण्यावर बंदी घालावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. फराजचे वडील मोहम्मद कुरेशी भारतीय स्टेट बँकेच्या रामटेक शाखेत नोकरी करतात. फराजला मोठा भाऊ असून, तो रामटेकच्या किट्सचा विद्यार्थी आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.