वाढदिवशीच घेतली विद्यार्थ्याने फाशी; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:42 AM2020-08-06T10:42:19+5:302020-08-06T10:42:47+5:30
कुटुंबीयांसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने वाढदिवसाच्या दिवशी फाशी घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंबीयांसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने वाढदिवसाच्या दिवशी फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंगोलेनगर येथे घडली. मृत १९ वर्षीय नितीन उदयभान साहू आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या नितीनच्या घरी किराणा दुकान आहे. कुटुंबात आईवडिलांबरोबरच मोठी बहीण आहे. मंगळवारी नितीनचा जन्मदिवस होता. कुटुंबीयांनी नितीनसोबत सायंकाळी वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले होते. दुपारी नितीन अचानक मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला. तो रात्री ८ वाजता परतला. घरच्यांनी विचारल्यावर मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करण्यास गेल्याचे त्याने सांगितले. कुटुंबीयांनी त्याला बाहेर कोरोनाचे संक्रमण असल्यामुळे घरातच वाढदिवस सादर करायचा होता, असा सल्ला दिला. यावरून नितीनचा घरच्यांसोबत किरकोळ वाद झाला.
घरच्यांसोबत वाद झाल्याने नितीन शेजारी राहणाऱ्या काकाच्या घरी जाऊन झोपला. कुटुंबीयांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पण बुधवारी पहाटे ५ वाजता नितीनची बहीण छतावर जात असताना, तिला नितीन जिन्याखाली फाशीवर लटकताना दिसला. नितीनने आईच्या साडीने गळफास लावला. कुटुंबीयांनी त्याला खाली उतरवून खासगी दवाखान्यात नेले, तेव्हा नितीनचा श्वास सुरू होता, परंतु रुग्णालयाने त्याला भरती करून घेण्यास नकार देत मेडिकलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मेडिकलमध्ये पोहचेपर्यंत नितीनचा जीव गेला होता.
नितीनने पहाटे पहाटे फाशी घेतल्याचा संशय आहे. नितीनची अवस्था बघून त्याच्या आईची शुद्ध हरवली होती. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीससुद्धा घटनास्थळी पोहचले. हवालदार रमेश विंचूरकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. एकुलत्या एका मुलाने जन्मदिनालाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शाहू कुटुंबीयांना धक्का बसला आहे.