मोबाईल पालकांजवळ अन् विद्यार्थी घरात; शाळा सकाळी १०.३० ते ५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 12:25 PM2021-07-05T12:25:01+5:302021-07-05T12:25:39+5:30
Nagpur News सर्वच माध्यमाच्या शाळा सकाळी १०.३० ते ५ या कालावधीत भरविण्याचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात शिक्षक घरातच असल्याने त्यांना शिक्षा म्हणून हा निर्णय विभागाने घेतला तर नाही ना, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सर्वच माध्यमाच्या शाळा सकाळी १०.३० ते ५ या कालावधीत भरविण्याचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात शिक्षक घरातच असल्याने त्यांना शिक्षा म्हणून हा निर्णय विभागाने घेतला तर नाही ना, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित होत आहे. पण १०.३० ते ५ या कालावधीत शाळेत शिक्षक असले तरी विद्यार्थ्यांजवळ मोबाईल नसेल तर नुकसान विद्यार्थ्यांचेच आहे, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे सत्यही आहे.
यंदाच्याही सत्रात शिक्षण हे आभासी माध्यमातूनच सुरू ठेवण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. असे असले तरी शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शिक्षकांची शाळेची वेळ निश्चित करण्यामागे शिक्षण विभागाने काही कारणे दिली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे लसीकरणाची मोहीम तीव्र गतीने राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील अनेक शाळास्तरावर लसीकरण, कोविड चाचण्या आदी कार्य सुरू असल्याने शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्ह्यात विविध अधिकाऱ्यांच्या गावभेटीही सुरू आहेत. अशावेळी शाळा पूर्णवेळ सुरू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे १ जुलैपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांची वेळ सकाळी १०.३० ते ५ अशी करण्यात आली आहे. शिक्षकांना कर्तव्य बजावयाचे असल्याने त्यांनी निर्णयाचा स्वीकार केला आहे. पण या वेळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना अडचणी येत आहेत. कारण बहुतांश पालक या वेळेत नोकरीवर कामानिमित्त बाहेर जात असल्याने मोबाईल सोबत घेऊन जातात.
ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात साधनांच्याच अडचणी मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. ग्रामीण भागात तर अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे ते कामावर जाताना सोबत घेऊन जातात. शहरातील पालकांकडे स्मार्ट फोन असला तरी, ते मुलांना एकट्यात वापरण्यास देत नाहीत. शाळेच्या वेळेत स्मार्टफोन उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २० टक्क्यांपेक्षा जास्त नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
काही शाळांनी केली होती तडजोड
ग्रामीण भागातील काही शाळांनी पालक घरी असतानाची वेळ लक्षात घेऊन सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ऑनलाईन शिकवणी सुरू केली होती. संध्याकाळीसुद्धा ७ ते ९ दरम्यान ऑनलाईन क्लासेस सुरू केले होते. त्यामुळे शिक्षक शाळेत उशिरा यायचे. पण या निर्णयामुळे शिक्षकांनी सकाळचे वर्ग बंद केले. शाळेतूनच ऑनलाईन शिक्षण सुरू केले. आता वर्गाला १५ ते २० टक्केच प्रतिसाद मिळत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
शाळेत विद्यार्थीच नसल्याने शिक्षक बसून करणार काय?
ऑनलाईन शिक्षण देताना विद्यार्थ्यांजवळ मोबाईल कधी उपलब्ध राहील, हे लक्षात घेऊनच शिक्षण द्यावे लागते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शिकवणेही सुरू केले होते. शाळेत यायला आमचा नकार नाही. पण वेळेचे बंधन लावून काहीच साध्य होणार नाही. विद्यार्थीच नसल्यामुळे किमान तीन तासाची शाळा असावी.
-मिलिंद वानखेडे, अध्यक्ष, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ
- आमचा मुलगा सातव्या वर्गात आहे. आम्ही दोघेही नोकरी करतो. मुलाच्या हातात दिवसभर मोबाईल देणे सोयीस्कर नाही. घरात ज्येष्ठ मंडळी आहे. पण पूर्णवेळ त्यांच्यावर लक्ष देऊ शकत नाही. सकाळी किंवा सायंकाळी आम्ही घरी असल्याने मुलावर लक्ष ठेवू शकतो. त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी वर्ग घ्यायला हवे.
संगीता मस्के, पालक