विद्यार्थिनीची कन्हान नदीत उडी : शोधकार्य सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:28 AM2019-09-06T00:28:08+5:302019-09-06T00:29:38+5:30
कला शाखेच्या विद्यार्थिनीने पुलावरून कन्हान नदी उडी मारली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - पारशिवनी मार्गावर गुरुवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा ): कला शाखेच्या विद्यार्थिनीने पुलावरून कन्हान नदी उडी मारली. वृत्त लिहिस्तो तिचा थांगपत्ता लागला नव्हता. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - पारशिवनी मार्गावर गुरुवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली. तिने सदर पाऊल प्रेमप्रकरणातून उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पूजा साहू (१९, रा. भानेगाव, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिची अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याशी मैत्री होती. शिवाय, त्याच्या कुटुंबीयांचे पूजाच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध असून, दोन्ही कुटुंब भानेगाव येथे शेजारी राहतात. पूजाचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे ती तणावात होती. या विषयाचा निपटारा करण्यासाठी दोघेही गुरुवारी दुपारी भेटले होते.
तो तिला सोबत घेऊन कोराडीला गेला होता. तिथे याच विषयावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्याने तिची समजूत काढली आणि तिला घेऊन भानेगावला आला व पारशिवनी मार्गे तामसवाडीला गेले. त्यानंतर दोघेही चर्चा करीत खापरखेडा - पारशिवनी मार्गावरील कन्हान नदीच्या पुलावर आले. आधार कार्ड पडल्याचा बहाणा करीत तिने पुलावर गाडी थांबविली. त्यावेळी तो फोनवर बोलत होता. त्याचे लक्ष नसल्याचे पाहून ती पुलाच्या कठड्यावर चढली. त्याचवेळी त्याचे तिच्याकडे लक्ष गेले.
त्यामुळे तो ओरडत तिच्या दिशेने धावला. तो तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तिने पुलावरून नदीत उडी मारली. नदी दुथडी भरून असल्याने ती प्रवाहाबरोबर वाहत गेली. त्यातच त्याने तिच्या चपला घेऊन पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून तिचा शोध घेतला असता, कुठेही थांगपत्ता लागला नाही.