अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:41+5:302021-01-04T04:08:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटीला जाेरात धडक दिली. त्यात विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटीला जाेरात धडक दिली. त्यात विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. दाेघेही अल्पवयीन आहेत. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-कळमेश्वर मार्गावरील काेलार नदीच्या पुलावर रविवारी (दि. ३) सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली.
भूषण सुरेश कुंभरे (१२, रा. गुमगाव माईन्स, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थ्याचे तर शंकर रमेश जाधव (१४, रा. वेकाेलि काॅलनी, सावनेर) असे जखमीचे नाव आहे. भूषण त्याच्या आत्याकडे वेकाेलि काॅलनी, सावनेर येथे पाहुणा म्हणून आला हाेता. आत्याच्या शेजारी राहणाऱ्या शंकरसाेबत ताे भाजीपाला खरेदी करण्यासाठी सावनेर शहरातील बाजारात आला हाेता. भूषणला बाजारात त्याचे वडील भेटले. वडिलांनी दाेघांनाही भाजीपाला विकत घेऊन दिला आणि ते ऑटाेने गुमगावला जायला निघाले.
भूषण व शंकर दाेघेही एमएच-४०/बीएस- क्रमांकाच्या स्कुटीने वेकाेलि बजाज काॅलनीकडे निघाले. ते सावनेर शहरालगतच्या काेलार नदीच्या पुलावर पाेहाेचताच विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या स्कूटीला जाेरात धडक दिली. त्यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. भूषणचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून भूषणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर शंकरला उपचारासाठी सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर शंकरला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार अशाेक काेळी करीत आहेत.
...
एकुलता एक मुलगा
भूषणचे वडील गुमगाव येथे काम करून उदरनिर्वाह करतात. ताे एकुलता एक मुलगा असून, खापा (ता. सावनेर) येथील जिजामाता विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिकायचा. त्याला माेठी बहीण आहे. काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने ताे पाहुणा म्हणून त्याच्या आत्याकडे वेकाेलि काॅलनी सावनेर येथे आला हाेता. वडिलांना त्याच्या मृत्यूची बातमी प्रवासातच कळली.