नागपूर जिल्ह्यातील देवलापार भागात तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:49 AM2018-05-12T00:49:07+5:302018-05-12T00:49:28+5:30
तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांनी पाण्यातील गाईची शेपटी पकडली आणि पोहायला सुरुवात केली. दोघांनाही गाईने खोल पाण्यात नेले व मागचा भाग हलविला. त्यामुळे दोघेही बुडाले. यातील एकाला वाचविण्यात गुराख्याला यश आले तर दुसऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदेवाणी शिवारात शुक्रवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांनी पाण्यातील गाईची शेपटी पकडली आणि पोहायला सुरुवात केली. दोघांनाही गाईने खोल पाण्यात नेले व मागचा भाग हलविला. त्यामुळे दोघेही बुडाले. यातील एकाला वाचविण्यात गुराख्याला यश आले तर दुसऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदेवाणी शिवारात शुक्रवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास घडली.
साहील अनिल वरठी (१०, रा. सिंदेवाणी, ता. रामटेक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. साहील सिंदेवाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शळेतील इयत्ता चौथीत शिकायचा. साहील हा त्याचे मित्र राम भोजलाल भलावी, खुशाल श्रीचंद कोकोडे व आयुष विनोद वरठी, तिघेही रा. सिंदेवाणी यांच्यासोबत गावालगतच्या तलावात पोहायला गेला होता. साहील व आयुष पोहायला तलावात उतरले तर राम व खुशाल किनाऱ्यावर बसून होते.
काही वेळातच पाणी पिण्यासाठी आलेली गाय तलावात शिरली. दोघेही गाईची शेपटी पकडून पोहू लागले. शिवाय, गाईसोबत खोल पाण्यात गेले. गाईने मागचा भाग हलविल्याने दोघांच्याही हातातील शेपटी सुटली व ते गटांगळ्या खाऊ लागले. गाय मात्र पाण्याबाहेर निघून गेली. ही बाब लक्षात येताच जवळच असलेला ओमप्रकाश रामटेके, रा. सिंदेवाणी याने पाण्यात उडी घेऊन दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला आयुषला पकडून बाहेर आणले आणि परत पाण्यात जाऊन साहील शोध घेऊ लागला. परंतु, साहील खोल पाण्यात गेल्याने त्याला गवसला नाही. माहिती मिळताच साहीलचे कुटुंबीय, ग्रामस्थ, ठाणेदार सुरेश मट्टामी, उपनिरीक्षक सुनील पाटील, शिपाई रोशन नारनवरे यांनी घटनास्थळ गाठून साहीलचा शोध घ्यायला सुरुवात केली.
अखेर मृतदेह गवसला
साहीलला शोधण्यासाठी स्थानिक मासेमारी व डोंग्याची मदत घेण्यात आली. शेवटी चार तासांच्या शोधकार्यानंतर साहीलचा मृतदेह गवसला. उत्तरीय तपासणीप्रक्रिया आटोपल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निखिल वरठी (१५) हा साहीलचा मोठा भाऊ होय. तो २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. याबाबत त्याचे वडील अनिल वरठी यांनी देवलापार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र, तो अद्यापही गवसला नाही.