कॉलेजसमोर विद्यार्थ्याची हत्या
By admin | Published: January 21, 2016 02:31 AM2016-01-21T02:31:06+5:302016-01-21T02:31:06+5:30
मुलीसोबत बोलण्याच्या कारणामुळे उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खून करण्यात आला. ....
कामठीतील घटना : एका आरोपीला अटक, चौघे पसार
कामठी : मुलीसोबत बोलण्याच्या कारणामुळे उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खून करण्यात आला. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले. खुनाची ही घटना कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कामठीत काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर चार साथीदार पसार झाले आहेत.
शेख दानिश शेख अन्वर (२०, रा. नया गोदाम, कामठी) असे मृताचे तर जखमीमध्ये त्याचा लहान भाऊ शेख राजिक शेख अन्वर (१६) आणि त्याचा मित्र आकाश श्यामलाल राऊत (२१) यांचा समावेश आहे. आरोपीमध्ये अमन अनिल यादव (१८) याच्यासह इतर चौघांचा समावेश आहे. यापैकी अमनला अटक करण्यात आली. दानिश हा सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होता. तो त्याचा भाऊ राजिक (११ वी)आणि मित्र आकाश यांच्यासह बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महाविद्यालयात आला. ११.३० वाजताच्या सुमारास तो महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थिनीसोबत बोलत होता. त्याचवेळी बारावीत शिकणारा अमन यादव तेथे आला. त्याने मुलीसोबत का बोलतो, अशी दानिशला विचारणा केली. त्यामुळे वाद उद्भवून दानिश आणि त्याचा भाऊ राजिक या दोघांनी अमनला मारहाण केली.
छातीवर केले चाकूने वार
नागपूर : मारहाणीबाबत त्याने त्याच्या चार साथीदारांना माहिती दिली. त्या सर्वांसोबत अमन दुपारी १ वाजताच्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उभा होता.
तेथे राजिक आला असता आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या मदतीसाठी सादिक धावला असता आरोपीने दानिशच्या छातीवर चाकूने वार केले. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन दानिश तेथेच पडला.
दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी आकाश आला. मात्र आरोपींनी त्याच्या मांडीवर चाकूने वार केला. यानंतर सर्व आरोपी कन्हानच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती कामठी पोलिसांना मिळताच ठाणेदार उत्तम मुळक, सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चचेरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी दानिशला मृत घोषित केले. राजिकच्या डोक्याला किरकोळ दुखापत असून आकाश हा गंभीर आहे. त्याच्यावर सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)