नागपूर जिल्ह्यात लवकरच दिसणार ‘स्टुडंट पोलीस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:18 PM2020-02-20T12:18:54+5:302020-02-20T12:19:57+5:30
सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे प्रशिक्षण देऊन ‘स्टुडंट पोलीस कॅडेट्स’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील १९ सरकारी शाळांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे प्रशिक्षण देऊन ‘स्टुडंट पोलीस कॅडेट्स’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १९ सरकारी शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतील वर्ग ८ व ९ चे ६० विद्यार्थी निवडण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील नगर परिषद माध्यमिक हायस्कूलमधून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुशासन आणि कायद्याचेही ज्ञान मिळणार आहे.
स्टुडंट पोलीस कॅडेट या उपक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यापक विकास व्हावा, देशभक्ती व सेवेची मूल्ये वाढविण्याची क्षमता निर्माण व्हावी, असा उद्देश यामागे आहे. पोलीस दल आधुनिकीकरण योजनेंतर्गत जिल्हास्तरावर सुकाणु समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून, अप्पर पोलीस अधीक्षक हे सदस्य सचिव व प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सदस्य आहे. या समितीच्या समन्वयातून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाचे दोन टप्पे करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसिंग आणि विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरुकता, समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुध्द लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचार विरुध्द लढा, आपत्ती व्यवस्थापन, मुल्ये आणि नीतीशास्त्र, संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडिलधाऱ्यांचा आदर करणे, वृत्ती, संघभावना, शिस्त आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात येईल. दुसºया टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयाच्या भेटी देऊन होत असलेल्या कामकाजासंदर्भात माहिती देण्यात येईल. या प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी म्हणून नागपूर (ग्रा.) पोलीस दलाच्या भरोसा सेलचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद धवड, जि.प. प्राथमिक विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे आदी राहणार आहे.