विद्यार्थी राजकारणाचे केंद्र जमीनदोस्त होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 09:12 PM2018-08-29T21:12:26+5:302018-08-29T21:13:51+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पूर्णचंद्र बुटी सभागृहाचे वेगळेच महत्त्व आहे. विद्यार्थी राजकारण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या या इमारतीने विद्यापीठातील अनेक बदल पाहिले आहे. मात्र आता ही इमारत पाडण्यात येणार असून तेथे विद्यापीठाकडून ‘पार्किंग’साठी दुमजली इमारतीसह नवीन सभागृह बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला गुरुवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पूर्णचंद्र बुटी सभागृहाचे वेगळेच महत्त्व आहे. विद्यार्थी राजकारण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या या इमारतीने विद्यापीठातील अनेक बदल पाहिले आहे. मात्र आता ही इमारत पाडण्यात येणार असून तेथे विद्यापीठाकडून ‘पार्किंग’साठी दुमजली इमारतीसह नवीन सभागृह बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला गुरुवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालय परिसरात पूर्णचंद्र बुटी सभागृह आहे. १९६८ साली हे सभागृह बांधण्यात आले होते. विद्यार्थी निवडणुकांच्या काळात या हे सभागृह राजकारणाचे केंद्र होते. याच इमारतीत विद्यार्थी परिषदेचे कार्यालयदेखील आहे. सोबतच येथे विद्यापीठातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येते.
मात्र ही इमारत जुनी झाली असून याला काही वर्षांपूर्वी नवीन रुप देण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु इमारतीच्या स्थापत्य तसेच विद्युतसंबंधी परीक्षण व दुरुस्तीच्या कामावर वारंवार खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ही इमारत पाडून येथे अद्ययावत दोन मजली इमारत व त्याच्यावर सभागृह बांधण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातर्फे तयार करण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला येणार होता. मात्र सर्व मुद्द्यांवर चर्चा न होऊ शकल्याने हा विषय गुरुवारी होणाºया बैठकीत चर्चेला येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘मेट्रो’साठी द्राविडी प्राणायाम
सूत्रांनी दिलेली माहिती धक्कादायकच आहे. बुटी सभागृहाच्या बाजूला विद्यापीठ ग्रंथालय आहे. ग्रंथालयाच्या समोरील बाजूने ‘मेट्रो’ जाणार आहे. ‘मेट्रो कॉरिडॉर’मध्ये भूखंड सीमेपासून दोन्ही मार्गाच्या बाजूने ३ मीटरची जागा फूटपाथसाठी सोडावी लागेल. त्यामुळे या परिसरातील खुली जागा व पार्किंगचे क्षेत्र कमी होईल. यासाठी या पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी दुमजली ‘पार्किंग’ची व्यवस्था असलेली इमारत उभारण्यात येणार आहे. ही इमारत अद्ययावत असेल असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. मात्र नागपूर ‘मेट्रो’च्या मार्गावर शहरभरात अशा अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत. अनेक इमारतींची काही जागा ‘मेट्रो’साठी सोडावी लागणार आहे. जर त्या इमारतींना पाडण्यात येत नसेल तर मग नागपूर विद्यापीठाकडूनच हा द्राविडी प्राणायाम का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘पार्किंग’साठी अशी लागतेच किती जागा ?
ग्रंथालयामध्ये साधारणत: विद्यार्थ्यांच्या दुचाकीचे ‘पार्किंग’ होते. ‘मेट्रो’मुळे तीन मीटरची जागा जाणार असली तरी ग्रंथालय परिसरात मोकळी जागा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ‘पार्किंग’ची समस्या निर्माण होण्याची फारशी शक्यता नाही. शिवाय परिसरातील इतर विभागांतदेखील ‘पार्किंग’साठी जागा आहेच. मग ‘पार्किंग’च्या नावाखाली बुटी सभागृह पाडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न व्यवस्थापन परिषदेतील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे.