नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; शुल्क वाढीसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

By आनंद डेकाटे | Published: September 19, 2022 06:15 PM2022-09-19T18:15:24+5:302022-09-19T18:22:08+5:30

विद्यापीठ कॅम्पसचे गेट बंद असल्याने कुणालाच आत जाता येत नव्हते. त्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली.

Student protest against fee hike in Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University RTM | नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; शुल्क वाढीसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; शुल्क वाढीसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क वाढ रद्द करण्याच्या मागणीसह विविध शैक्षणिक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक रुप धारण केले. विद्यार्थ्यांनी सोमवारी अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पसचे गेट बंद करीत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. गेट बंद असल्याने कुणालाच आत जाता येत नव्हते. त्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. अखेर प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. पीएचडी पदवीच्या प्रवेश नोंदणी शुल्कात केलेली शुल्क वाढ रद्द करावी. 'कमवा आणि शिका' योजनेतील मानधन व जागांची उपलब्धता वाढविण्यात यावी, मागेल त्यांना काम या तत्वावर ही योजना पूर्ववत राबविण्यात यावी.

नागपूर विद्यापीठात दुसऱ्यांदा पदव्युत्तर पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा वसतीगृहात प्रवेश देण्यात यावा. विद्यापीठाच्या सर्व ग्रंथालयात विद्यार्थ्यांना खुला प्रवेश मिळावा, प्रवेशीत विद्यार्थ्याकरिता व्यायामशाळा विनाशुल्क करण्यात यावी, विद्यापीठाच्या विभागांमध्ये आणि ग्रंथालयात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नियमित करण्यात यावी. विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने योग्य ती यंत्रणा कार्यान्वित करावी, पदव्युत्तर पदवी वसतीगृह प्रवेश शुल्कात ५ टक्के वाढ करणारे परिपत्रक रद्द करावे, विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर येथे ३०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह निर्माण करण्यात यावे. विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरात ५०० विद्यार्थी बसतील या क्षमतेचे ग्रंथालय उभारावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे अमरावती रोडवरील वाहतूकही काही विस्तळीत झाली होती. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण अवगड, प्रगती बोरकर, शुभांगी खंडारे, स्नेहल वासनिक आंदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Student protest against fee hike in Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University RTM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.