चेहऱ्याला ‘बर्थ डे’ केक लावला म्हणून राग अनावर, विद्यार्थ्यावर चाकूने वार
By योगेश पांडे | Published: June 1, 2023 03:59 PM2023-06-01T15:59:00+5:302023-06-01T15:59:31+5:30
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत असताना चेहऱ्याला केक लावण्याची फॅशन तरुण पिढीत दिसून येते. मात्र याच ट्रेंडचे अनुकरण केल्यामुळे एका बर्थ डेचा बेरंग झाला व चेहऱ्याला ‘बर्थ डे’ केक लावला म्हणून संतापलेल्या एका तरुणाने विद्यार्थ्यावर चाकूने वार केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रोजकरजा मुस्तफा कुरेशी (२१, रामकृष्ण नगर, दिघोरी) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी त्याचा मित्र साहीलचा वाढदिवस असल्याने पाच ते सहा मित्र रात्री दहाच्या सुमारास त्याच्या घरी पोहोचले. साहिलच्या घरी केक आणण्यात आला होता व तो केक कापल्यानंतर मित्रमंडळींना एकमेकांना केक लावण्यास सुरुवात केली.
कुरेशीनेदेखील साहिलचा शेजारी अमन चंद्रकांत कोडापे (२०, नूरनगर) याच्या चेहऱ्यावर केक लावला. यावरून अमन संतापला व त्याने कुरेशीला धक्का देत शिवीगाळ केली. सर्वच जण एकमेकांना केक लावत आहे, त्यात संतापण्यासारखे काय असे कुरेशीने म्हटले असता अमन आणखी संतापला व त्याने खिशातून चाकू काढत कुरेशीच्या चेहऱ्यावरच वार केले. कुरेशीच्या डोळ्याजवळ जखम झाली व रक्त निघायला लागले. उपस्थित मित्रांनी लगेच कुरेशीला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नेले व तेथून त्याला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात पाठविण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून अमन कोडापेविरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.