विद्यार्थिनीला भररस्त्यात मारहाण
By admin | Published: August 17, 2015 02:49 AM2015-08-17T02:49:36+5:302015-08-17T02:49:36+5:30
सोबत चलण्यास नकार दिला म्हणून एका आरोपीने विद्यार्थिनीला भररस्त्यात मारहाण करून तिचा मोबाईल फोडला.
लकडगंजमधील घटना : अजनीतही विनयभंग
नागपूर : सोबत चलण्यास नकार दिला म्हणून एका आरोपीने विद्यार्थिनीला भररस्त्यात मारहाण करून तिचा मोबाईल फोडला. ऐन स्वातंत्र्यदिनी सकाळी १०.३० च्या सुमारास लकडगंजमधील एका शैक्षणिक संस्थेसमोर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
पीडित युवती (वय १७) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या महाविद्यालयात आली होती. झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर ती महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उभी होती. तेवढ्यात ईनामुल अब्दुल वजिर पिंजारी (वय २३) दुचाकीने तेथे आला. त्याने तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले. तिने नकार दिला असता आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर तिचा मोबाईल रस्त्यावर फोडला. यावेळी आजूबाजूला मोठ्या संख्येत नागरिक होते. त्यांनी इनामुलला हटकले असता, ‘हमारा आपसी मामला है‘ असे म्हणत त्याने नागरिकांनाच दटावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घटनास्थळी संतप्त वातावरण निर्माण झाले. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याला रविवारी अटक करण्यात आली. अजनीतही २४ वर्षीय महिलेच्या घरात शिरून आरोपी आदित्य मेश्राम (वय २५, रा. जयभीम नगर, त्रिशरण चौक) याने तिचा विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम ३५४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी)