लपाछपी खेळायला गेलेल्या विद्यार्थ्याचा हाय व्हाेल्टेज तारांनी घेतला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 08:29 PM2022-01-05T20:29:50+5:302022-01-05T20:31:18+5:30
Nagpur News मामाच्या मुलांसाेबत घराच्या छतावर खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा छतावरून गेलेल्या विजेच्या हाय व्हाेल्टेज तारेला स्पर्श झाला आणि जाेराचा विजेचा धक्का लागल्याने त्याचा काही क्षणात मृत्यू झाला.
नागपूर : मामाच्या मुलांसाेबत घराच्या छतावर खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा छतावरून गेलेल्या विजेच्या हाय व्हाेल्टेज तारेला स्पर्श झाला आणि जाेराचा विजेचा धक्का लागल्याने त्याचा काही क्षणात मृत्यू झाला. ही घटना वाडी शहरात बुधवारी (दि. ५) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रतीक संतोष मेश्राम (१६, रा. मंगलधाम सोसायटी, वाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रतीक आठव्या वर्गापासून वाडी शहरातील श्रीमती विमलताई तिडके विद्यालयात शिकायचा. ताे या वर्षी दहावीच्या वर्गात हाेता. काेराेना संक्रमणामुळे शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आणि ताे त्याच्या आईवडिलांसाेबत अमरावती शहरात राहायला गेला हाेता. अलीकडे, शाळा सुरू झाल्याने तसेच दहावीचे वर्ष असल्याने ताे काही दिवसांपूर्वी मामा कैलास गुरादे यांच्याकडे राहायला आला हाेता.
प्रतीक शाळा सुटल्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरी आला हाेता. जेवण आटाेपल्यानंतर ताे मामाचा छाेटा मुलगा व मुलीसाेबत घराच्या छतावर लपंडाव खेळायला लागला. विशेष म्हणजे, त्याच्या मामाच्या घरावरून ११ केव्ही क्षमतेच्या हाय व्हाेल्टेज विजेच्या तारा गेल्या आहेत. खेळताना प्रतीकच्या हाताचा स्पर्श तारेला झाला. ताे प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच मुलांनी लगेच खाली येत आईला (प्रतीकची मामी) सांगितले. तिने वर जाऊन बघितले तेव्हा ताे तिला मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे तिने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांच्या सूचनेवरून पाेलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून प्रतीकला बाजूला केले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
विजेच्या तारा धाेकादायक
वाडी, हिंगणा यांसह अन्य काही शहरांमधील काही घरांवरून विजेच्या हाय व्हाेल्टेज तारा गेल्या आहेत. यापूर्वी हिंगणा परिसरात हाय व्हाेल्टेज तारांना स्पर्श झाल्याने दाेन, वाडी परिसरात एका मुलाचा मृत्यू झाला हाेता. विशेष म्हणजे, त्या तारा घरांवरून गेल्या असून, मुले छतावर खेळत हाेती. या तारा धाेकादायक ठरत असल्या तरी प्रशासन त्या स्थानांतरित करण्याची किंवा त्याला काेटिंग करण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे या तारा आणखी किती मुलांचा जीव घेणार,असा प्रश्न उद्भवत आहे.