नागपूर विद्यापीठ की 'कर्मचारी प्रायव्हेट लिमिटेड'? विद्यार्थ्यांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 12:35 PM2022-04-08T12:35:21+5:302022-04-08T12:42:24+5:30
कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करत ताटकळत राहावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सकाळी १० वाजता कार्यालयीन कामकाज सुरु होते. परंतु, विद्यापीठातील महत्त्वाचा भाग असलेल्या परीक्षा भवनासाठी बहुदा वेगळे नियम लावले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात. आश्चर्य म्हणजे अनेक अधिकारीच उशिरा येत असल्याने कर्मचारीही त्यांचीच री ओढतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करत ताटकळत राहावे लागते. त्यामुळे हे नागपूर विद्यापीठ आहे की कर्मचाऱ्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी? असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने ‘लोकमत’ने सकाळी १० वाजता जाऊन पाहणी केली असता, बहुतांश विभागांमध्ये सामसूमच होती. काही मोजके अधिकारी व कर्मचारी सोडले तर बहुतांश जण आपापल्या सोयीने आरामात येत होते. त्यांना विचारणा करणारी यंत्रणाच नसल्याचे दिसून आले. सकाळी ११ वाजताही अर्धे कर्मचारी जागेवर पोहोचले नव्हते.
प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय का ?
व्यावसायिक परीक्षा, सामान्य परीक्षा, पीएचडी आदी विभागांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत अगदी बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी व अधिकारी होते. हे कर्मचारी वेळ पडली तर कार्यालयीन वेळ संपल्यावरही थांबतात. कामाचा भार आमच्यावर येतो. असे असताना इतरांना सूट व प्रामाणिक कर्मचाऱ्यांवरच अन्याय का? असा प्रश्न एका कर्मचाऱ्यानेच केला.
बायोमेट्रिक नव्हे रजिस्टरवर सही
परीक्षा विभागात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशिन्स बसविण्यात आल्या होत्या. परंतु, मनमर्जीने कामावर येण्याची सवय असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याचा विरोध केला होता. या मशीन आता बंदच असून, कर्मचारी केवळ रजिस्टरमध्ये येऊन सही करतात. मात्र, त्यात त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेची नोंद व त्याची चाचपणी करणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या अधिकाऱ्यांच्या कक्षात हे रजिस्टर ठेवण्यात आले होते, तेथे ते अधिकारीच उपस्थित नव्हते.
विद्यार्थ्यांना मनस्ताप
विद्यार्थी, महाविद्यालयीन कर्मचारी विविध कामांसाठी विद्यापीठात येतात. अनेकजण बाहेरगावाहून येतात. मात्र, वेळेत कर्मचारी व अधिकारीच उपस्थित नसतात. अनेकजण अर्धा दिवस सुट्टी घेऊन येतात व त्यांना ताटकळत राहावे लागते. या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची इतकी मेहरनजर का आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे.
अशी होती विभागांची स्थिती
- परीक्षा व मूल्यमापन संचालक कार्यालय : बहुतांश सर्व कर्मचारी उपस्थित
- अर्ज भरणा केंद्र : अनेक कर्मचारी उपस्थित
- व्यावसायिक परीक्षा : बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी उपस्थित
- पीएचडी विभाग : बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी उपस्थित
- परीक्षा चौकशी विभाग : डिग्री व्हेरिफिकेशन व एलिजिबिलिटी डेस्क सोडून सर्व अनुपस्थित