विद्यार्थीनींनो अशी करा स्वत:ची सुरक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:10 AM2019-08-31T00:10:00+5:302019-08-31T00:27:15+5:30
जर आणि तुमचा आवाज हे तुमचे प्रभावी शस्त्र आहेत. ते २४ तास तुमच्या सोबत असतात. त्याचा योग्य पद्धतीने वापर करून स्वत:ची सुरक्षा स्वत:च करा, असा सल्ला वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाईट नजरेने बघणाऱ्याकडे तितक्याच त्वेषाने बघा. करड्या आवाजात त्याला जाब विचारा. नजर आणि तुमचा आवाज हे तुमचे प्रभावी शस्त्र आहेत. ते २४ तास तुमच्या सोबत असतात. त्याचा योग्य पद्धतीने वापर करून स्वत:ची सुरक्षा स्वत:च करा, असा सल्ला वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना दिला.
स्वत:ची सुरक्षा स्वत:च कशी करायची, याचे धडे देण्यासाठी पोलिसांनी उपराजधानीतील शाळा - महाविद्यालयात ‘जागरूक मी आणि समाज’ हा विशेष उपक्रम राबविला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून खास विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २६ ऑगस्टपासून या उपक्रमाची सुरूवात जरीपटक्यातील म. गांधी विद्यालयातून झाली तर समारोप ३० ऑगस्टला नंदनवनमधील केडीके कॉलेजमध्ये झाला. पाच दिवसाच्या या उपक्रमात पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपायुक्त विनिता साहू आणि उपायुक्त निर्मला देवी यांनी ८२ शाळा महाविद्यालयातील एकूण ३२५० विद्यार्थिनीशी संवाद साधून त्यांना सुरक्षेचे धडे दिले.
गुन्हे शाखा ईओडब्ल्यूच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांनी बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थिनी, महिलांना कसा त्रास होतो, त्याबाबतची काही उदाहरणे सांगितली आणि स्वत:ची सुरक्षा स्वत:च कशी करायची, त्याबाबतही मार्गदर्शन केले. तुमची नजर आणि तुमचा आवाज हेच तुमच्याजवळचे प्रभावी शस्त्र आहे. तुमच्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्याकडे तितक्याच करड्या नजरेने बघा आणि कडक आवाजात त्याला जाब विचारा छेड काढण्यासाठी आलेला गुंड तुमच्या आजूबाजूला रेंगाळणारच नाही, असे त्यांनी विद्यार्थिनीना सांगितले. मोबाईल हाताळताना कुणाच्या जाळ्यात अडकणार नाही, याची कशी काळजी घ्यायची, त्याबाबतही उपायुक्त खेडकर यांनी विद्यार्थिनींना मौलिक सल्ला दिला.
न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या चुकीच्या गोष्टीचा वेळीच विरोध करा. आम्ही वर्दीतील पोलीस आहोत आणि तुम्ही शाळेच्या गणवेशातील पोलीस आहात असे समजा. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा आणि अडचण आल्यास आम्हाला (पोलिसांना) कळवा) असा सल्ला पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांनी विद्यार्थिनीशी हितगूज करताना दिला.
विद्यार्थिनींचे कायदेशीर हक्क काय आहेत, ते समजावून सांगतानाच आपल्या सुरक्षेविषयी नेहमी सतर्क असायला हवे. सोबतच आपल्या आजूबाजूच्या महिला-मुलींसोबत काही चुकीचे घडत असेल तर आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करून गैरकायदेशीर प्रकार थांबवले पाहिजे, असे पोलीस उपायुक्त विनिता साहू म्हणाल्या. नेहमी जागरूक रहा, असा हितोपदेशही त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींच्या मनातील भीती काढण्यासाठी पोलीस अधिकारी त्यांना मंचावर येऊन मनातील प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करायच्या. काय अडचण आहे अन् कोणती उपाययोजना करायची, त्यासंबंधानेही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जायचे.
समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थिनी, शिक्षिका, प्राध्यापिका, प्राचार्या आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक अनुपमा जगताप यांनी केले. गुन्हे शाखेच्या भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक शुभदा संख्ये तसेच सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक उज्ज्वला मडावी, निशा भूते, हवालदार संतोष पुंडकर, नायक मंजू फुलबांधे, पूनम रामटेके, प्रभा खानझोडे, पूनम शेंडे आदींनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.