अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांची होतेय फरफट : प्रवेशाची लगबग आणि सर्व्हर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 09:05 PM2019-06-19T21:05:26+5:302019-06-19T21:06:52+5:30
अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कॉलेजसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सेतू केंद्रावरील असुविधा यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चांगलाच संताप व्यक्त होत होता. अखेर विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, सेतू केंद्राने दीडशे विद्यार्थ्यांच्या दस्तावेजाच्या तपासणीचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजता १५० विद्यार्थ्यांना टोकन देऊन इतरांना घरी पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कॉलेजसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सेतू केंद्रावरील असुविधा यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चांगलाच संताप व्यक्त होत होता. अखेर विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, सेतू केंद्राने दीडशे विद्यार्थ्यांच्या दस्तावेजाच्या तपासणीचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजता १५० विद्यार्थ्यांना टोकन देऊन इतरांना घरी पाठविण्यात आले.
सलग दोन दिवस सेतू केंद्रावरील सर्व्हर डाऊन असल्यामुळे दस्तावेजाच्या पडताळणीचे काम थांबविले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी ७ पासून विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रावर गर्दी केली होती. यावर्षीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या नियंत्रणात करण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी २१ जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी शहरातील काही कॉलेजमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सीईटी सेलने ही सर्व प्रक्रिया कल्प टेक्नॉलॉजिस्ट प्रा. लि. या कं पनीला दिली आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर दस्तावेजाची तपासणीचे कामाला अडथळा येत आहे. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयात हे सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी या केंद्रावर जवळपास ७०० ते ८०० विद्यार्थी व पालक पोहचले होते. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. दुपारी १२ नंतर सर्व्हर सुरू झाले. पण काम संथ गतीने होत असल्याने सेतू केंद्रातील ऑपरेटरने फक्त १५० विद्यार्थ्यांचे दस्तावेजाचे काम पूर्ण होईल, असे सांगून इतर विद्यार्थ्यांनी दोन-तीन दिवसानंतरचेही टोकन वाटप केले.
जे विद्यार्थी सकाळपासून पोहचले होते. त्यातील १५० विद्यार्थ्यांना दस्तावेजाच्या तपासणीसाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे सेतू केंद्रावर अपेक्षित माहिती देण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. सुरक्षा रक्षकाकडून अडवणूक करण्यात येत आहे.
सीईटी सेलचे नियंत्रण फेल
यापूर्वी प्रवेश प्रक्रिया डीटीईद्वारे राबविण्यात येत होती. तेव्हा एवढा त्रास विद्यार्थ्यांना झाला नाही. यावर्षी सीईटी सेलने ही प्रक्रिया स्वत:कडे घेऊन, त्यात चांगलीच गुंतागुंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. सीईटी सेलचे नियंत्रण फेल ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.