चक्क नागपुरातील एका ‘क्वारंटाईन’ केंद्रात शिरले विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:09 PM2020-06-11T22:09:09+5:302020-06-11T22:12:23+5:30
‘कोरोना’शी सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहातील ‘क्वारंटाईन’ केंद्रात चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे घेण्यासाठी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’शी सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहातील ‘क्वारंटाईन’ केंद्रात चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे घेण्यासाठी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जोखमीचे क्षेत्र असताना एकाने नावापुरती ‘पीपीई किट’ घातली होती तर दुसरा विद्यार्थी केवळ तोंडाला रुमाल लावून आला होता. या प्रकाराचे ‘व्हिडीयो’देखील ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाले आहेत. या विद्यार्थ्यांना आत जाण्याची परवानगी दिलीच कुणी असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांनादेखील ‘क्वारंटाईन’ करण्याची मागणी समोर येत आहे.
‘लॉकडाऊन’ जारी होण्याअगोदरच नागपूर विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्यास सांगितले होते. या विद्यार्थ्यांचे सर्व सामान ‘वॉर्डन’ डॉ.श्याम कोरेटी यांच्या देखरेखीत काही खोल्यात स्थानांतरित करुन पद्धतशीरपणे त्यांची मांडणीदेखील करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शासकीय यंत्रणेकडून तेथे ‘क्वारंटाईन’ केंद्र उभारण्यात आले. सद्यस्थितीतदेखील या इमारतीमध्ये संशयितांना ठेवण्यात आले आहे.
काही विद्यार्थ्यांना कागदपत्र व साहित्याची तातडीने आवश्यकता असल्याची मागणी सिनेट सदस्य प्रशांत डेकाटे व मानवाधिकार संघटनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने शासकीय यंत्रणेकडून परवानगी मिळेल असे सांगितले. त्यानंतर मनपा उपायुक्त राम जोशी यांच्याकडे ते गेले व जोशी यांनी तीन विद्यार्थ्यांना कागदपत्रे नेण्याची परवानगी दिली. परंतु असे करत असताना सुरक्षा संचाचा वापर करण्याची अट ठेवली.
तोंडाला रुमाल बांधून प्रवेश
‘क्वारंटाईन’ केंद्रातील अधिकाऱ्यांकडे ‘पीपीई किट्स’ ची कमतरता होती. त्यामुळे एकाच विद्यार्थ्याला ‘किट’ देण्यात आली. परंतु त्याने ती ‘किट’ अयोग्य पद्धतीने घातली होती. हातात तर ‘ग्लोव्हज’ऐवजी चक्क पॉलिथीन होते. त्याच्यासोबत गेलेल्या दुसºया विद्यार्थ्याने तर केवळ तोंडाला रुमाल बांधला होता. आत गेल्यावर त्यांनी सामानांना हात लावून आवश्यक ती कागदपत्रे काढली व ते परतले. मात्र अतिशय जोखमीचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी ‘पीपीई किट’ शिवाय परवानगी मिळालीच कशी व सुरक्षारक्षकांनी त्यांना सोडलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जीवापेक्षा कागदपत्रे महत्त्वाची का ?
संबंधित क्षेत्र जोखमीचे आहे याची माहिती असतानादेखील ‘सिनेट’ सदस्यांनी वारंवार प्रशासनाकडे विद्यार्थ्यांची मागणी लावून धरली होती. प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थ्यांना खरोखरच मुलाखतीचा ‘कॉल’ आला आहे का याची चाचपणीदेखील प्रशासनाने केली नाही. या वर्तनावर व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम यांनी नाराजी व्यक्त केली. जीवापेक्षा कागदपत्र महत्त्वाचे नाहीत. हा स्वत:सोबत समाजाचे आरोग्य धोक्यात टाकण्याचा प्रकार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने ‘क्वारंटाईन’ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
परवानगी कशी दिली ?
संंबंधित सदस्य आमच्याकडे अर्ज घेऊन आले होते. परंतु संंबंधित इमारतीचा ताबा सरकारी यंत्रणेकडे आहे. त्यामुळे त्यांचीच परवानगी लागेल, असे आम्ही स्पष्ट केल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना सुरक्षा संच घालूनच प्रवेश देण्याची सूचना दिली होती. जर कुणी नियमांचा भंग केला असेल तर त्यांना ‘क्वारंटाईन’ करण्यावर विचार करावा लागेल, असे राम जोशी यांनी सांगितले. दरम्यान, अशा क्षेत्रात जाण्याची त्यांना परवानगी मिळालीच कशी हा प्रश्न कायम आहे.