विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:19+5:302021-06-16T04:11:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे अनेक कुटुंबीयांची आर्थिक क्षमता ढासळली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या शुल्कासह परीक्षा शुल्कदेखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे अनेक कुटुंबीयांची आर्थिक क्षमता ढासळली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या शुल्कासह परीक्षा शुल्कदेखील भरणे कठीण झाले. विद्यापीठाकडून ऑनलाईन माध्यमातूनच परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात अभाविपने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्यासह व्यवस्थापन व सिनेट सदस्य विष्णू चांगदे, दिनेश शेराम, डॉ. निरंजन देशकर, डॉ. आर. जी. भोयर, डॉ. ऊर्मिला डबीर, डॉ. नितीन कोंगरे, डॉ. मिलिंद बारहाते यांना निवेदन दिले.
कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला असताना महाविद्यालयांकडून असंवेदनशील वर्तणूक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांवर शुल्क भरण्यासाठी मानसिक दबाव आणला जात आहे. लॉकडाऊनमुळे सर्व महाविद्यालय बंद असताना ग्रंथालय शुल्क, प्रोजेक्ट शुल्क, पार्किंग शुल्क, सांस्कृतिक शुल्क सारखे अनावश्यक शुल्क आकारण्यात येत आहे. या मुद्द्यांवर व्यवस्थापन परिषदेने चर्चा करावी व विद्यार्थी हिताचे निर्णय घ्यावे. महाविद्यालय शुल्कात ट्युशन फी वगळता सर्व शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी नागपूर महानगर मंत्री करण खंडाळे यांनी केली.