विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रावरील प्रवासाचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:54 PM2019-07-22T22:54:21+5:302019-07-22T22:57:15+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(इस्रो)ने ‘चंद्रयान-२’ या प्रकल्पासाठी तयार केलेले यान अवकाशात झेपावले. सोमवारी २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्र मिशनचा सॅटेलाईट प्रक्षेपित झाला. विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहचली असताना त्यांची उत्सुकता दूर करण्यासाठी रमण विज्ञान केंद्राने चंद्रयान-२ मिशनच्या आधारावर प्रदर्शनाचे आयोजन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(इस्रो)ने ‘चंद्रयान-२’ या प्रकल्पासाठी तयार केलेले यान अवकाशात झेपावले. सोमवारी २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्र मिशनचा सॅटेलाईट प्रक्षेपित झाला. विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहचली असताना त्यांची उत्सुकता दूर करण्यासाठी रमण विज्ञान केंद्राने चंद्रयान-२ मिशनच्या आधारावर प्रदर्शनाचे आयोजन केले. प्रदर्शनात चंद्रयान २ मध्ये काय राहील, कसे यान पृथ्वीवरून झेपावते, गुरुत्वाकर्षणामुळे कशी यानाला पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा मारावी लागते, चंद्रावर जाताना कशा रॉकेटच्या स्टेज वेगळ्या होतात ही सर्व माहिती जाणून घेऊन प्रदर्शनाला भेट देणारे विद्यार्थी थक्क झाले. पृथ्वी ते चंद्र असा प्रवास त्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुभवला. प्रदर्शनाला भेट देऊन अनेक विद्यार्थ्यांना अंतराळवीर होण्याची प्रेरणा मिळाली.
गुरुत्वाकर्षणामुळे सरळ झेपावत नाही यान
पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३८४४ लाख किलोमीटर आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती फार मोठी आहे. त्यामुळे चंद्राकडे झेपावणाऱ्या चंद्रयान २ या यानाला फार मोठ्या ऊर्जेची गरज भासते. त्यामुळे हे यान पृथ्वीच्या सभोवताल प्रदक्षिणा घालते. प्रदक्षिणा घातल्यामुळे यानाची कक्षा रुंदावते. कमी ऊर्जेत लांबचा पल्ला गाठावयाचा असल्यामुळे हे यान २३ दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरते. यानात फोर्स तयार झाल्यानंतर ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडते. चंद्रावर जाताना यानाचे भाग यानापासून वेगळे होतात. शेवटी चंद्रयान उरते, ही माहिती विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून जाणून घेतली.
ऑर्बिटर, लँडर अन् रोव्हरचे कार्य
प्रदर्शनात ऑर्बिटर, विक्रम नावाचे लँडर, प्रज्ञान नावाचे रोव्हर कसे काम करतात, याबद्दलची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. चंद्रयानात त्यांची भूमिका काय आहे हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. सुरुवातीला ऑर्बिटर वेगळे होते. त्यानंतर लँडर विक्रम वेगळे होऊन त्यातून रोव्हर कसे बाहेर येते, ही माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून जाणून घेतली.
यानात काय आहे ?
चांद्रयान झेपावल्यानंतर या यानात काय आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातही ही उत्सुकता होती. त्यामुळे चांद्रयानातील महत्त्वाचे घटक कोणते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यात चंद्रवरील प्रतिमा टिपण्यासाठी हाय रिझोलेशन कॅमेरा, चंद्राचा अभ्यास करण्यासाठी सायंस एक्सपिरीमेंट डिव्हाईस, चंद्रावरील खनिज घटकांचा शोध घेण्यासाठी अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्टोमिटर, चंद्राच्या पृष्ठभागातील वस्तूंचा शोध घेण्यासाठी लेझर रेट्रोरिफ्लेक्टर अॅरे, इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर आदींचा समावेश आहे. या सर्व घटकांची माहिती चित्राद्वारे विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.
चांद्रयान २ प्रकल्प मानवजातीसाठी महत्त्वाकांक्षी : कामेश्वर राव
चंद्राच्या ज्या भागाचा आणि ज्या बाबींचा सखोल अभ्यास झाला नव्हता तो अभ्यास या मोहिमेत होणार आहे. त्यामुळे भारतच नाही तर संपूर्ण मनुष्यजातीच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्राचे महाव्यवस्थापक एस. व्ही. सी. कामेश्वर राव यांनी केले. रमण विज्ञान केंद्रातर्फे चंद्रयान २ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे वैज्ञानिक राजकुमार अवसरे, रमण विज्ञान केंद्राचे मनोज कुमार पांडा, अभिमन्यू भेलावे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सायंस इन सिलॅबस या मोबाईल सायंस प्रदर्शनाच्या व्हॅनचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कामेश्वर राव यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान २ ची माहिती दिली. विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या शब्दात त्यांनी या मिशनचा उलगडा केला. चांद्रयान २ चंद्रावर कसे उतरेल त्याचा प्रवास कसा असेल याचीही माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिली. राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे राजकुमार अवसरे यांनी मोबाईल प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान पोहोचविणे शक्य होणार असल्याचे सांगितले. रमण विज्ञान केंद्राचे मनोज कुमार पांडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन आणि आभार प्रदर्शन अभिमन्यू भेलावे यांनी केले.