विद्यार्थ्यांनी मनोरंजनातून समजावले कठीण विज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:08 AM2019-11-09T01:08:57+5:302019-11-09T01:12:55+5:30
‘खुल के सोचो आवो, पंख जरा फैलाओ, चलो चलो नई बात करले...’, अशा मनोरंजक कृतीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचे आवाहन करणारे हे गाणं. अशा मनोरंजन कृतीतून कठीण वाटणारा विज्ञान विषयही सहज समजाविला जाऊ शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘खुल के सोचो आवो, पंख जरा फैलाओ, चलो चलो नई बात करले...’, अशा मनोरंजक कृतीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचे आवाहन करणारे हे गाणं. अशा मनोरंजन कृतीतून कठीण वाटणारा विज्ञान विषयही सहज समजाविला जाऊ शकतो. गणिताप्रमाणे विज्ञानही अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय. त्यातील अनेक गोष्टी डोक्यावरून जात असल्याने मुलांना कंटाळवाण्या वाटतात. रसायनशास्त्रातील ‘पीरियाडिक टेबल’ म्हणजे असाच नकोसा वाटणारा विषय. पण विद्यार्थ्यांनी या टेबलची मांडणी करणाऱ्या ‘मेंडेलियन काका की जय’ म्हणत सादर केलेल्या नाटकाने धम्माल उडविली आणि आपसूकच रासायनिक मूलद्रव्यांच्या पिरियाडिक टेबलकडे आकर्षित केले.
राष्ट्रीय विज्ञान परिषद संग्रहालय, कोलकातांतर्गत नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या १४ व्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयावर अप्रतिम नाट्यकृती सादर केली. शुक्र्रवारी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे ही विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धा दिमाखदारपणे पार पडली. मनोरंजनाच्या माध्यमातून विज्ञान विषय समाजापर्यंत पोहचविण्याच्या संस्थेच्या उद्देशाला विद्यार्थ्यांनी यशस्वी केले. महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, अमरावती, लातूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक व कोकण अशा आठ विभागामधून विद्यार्थ्यांच्या आठ चमूने नाटक सादर केली. सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते वसंत हंकारे व विभागीय उपायुक्त सुधाकर तेलंग यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. वर्ग ६ ते वर्ग १० च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती व प्रत्येक चमूमध्ये आठ विद्यार्थ्यांची मर्यादा होती. यावर्षी ‘समाज आणि विज्ञान’ या संकल्पनेवर ही संपूर्ण स्पर्धा आधारलेली होती. यामध्ये स्वच्छता, पर्यावरण, प्रदूषण, दळणवळण व गांधी आणि विज्ञान असे विषय देण्यात आले होते. युनेस्कोने २०१९ हे वर्ष ‘वर्ल्ड पिरियाडिक टेबल’ वर्ष म्हणून घोषित केल्याने या विषयाचाही समावेश स्पर्धेत होता.
विज्ञान शिक्षण संस्थेचे विभागप्रमुख प्रा. राजकुमार अवसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथम क्रमांकाच्या तीन नाटकांसह उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, लेखन व दिग्दर्शन असे चार पुरस्कार ठरविण्यात आले होते. यानुसार मुंबई विभागाच्या ‘गांधी आणि विज्ञान’ या नाटकाला प्रथम पुरस्कार, अमरावती विभागाच्या ‘सारणीचे आवर्तन’ या नाटकाला द्वितीय तर कोल्हापूरच्या टीमला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यापैकी पहिल्या दोन नाटकांची झोनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. अमरावतीच्या नाटकाच्या लेखिका नम्रता प्रेमलवार यांना लेखनाचा तर मुंबई टीमसाठी अभिनेता, अभिनेत्री व दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूरचे संचालक रविकांत देशपांडे, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.