‘फाईन आटर््स’मधील विद्यार्थी ‘कला’कार नाही
By admin | Published: July 3, 2017 02:30 AM2017-07-03T02:30:30+5:302017-07-03T02:30:30+5:30
साधारणत: रंगमंच किंवा ‘ड्रामा’ची आवड असणारा विद्यार्थी हा कलाकार होण्याची स्वप्ने पाहत असतो.
राज्य शासनाचा अजब निर्देश : आंतरशास्त्रीय विद्याशाखेत समावेश
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: रंगमंच किंवा ‘ड्रामा’ची आवड असणारा विद्यार्थी हा कलाकार होण्याची स्वप्ने पाहत असतो. त्यातूनच तो ‘फाईन आटर््स’मध्ये प्रवेश घेऊन कलेचे धडे गिरवतो. कलाकारांना घडविणारा अभ्यासक्रम अशी याची ओळख आहे. परंतु राज्य शासनाला मात्र हा अभ्यासक्रम कला शाखेतील नसल्याचा अजब जावईशोध लागला आहे. म्हणूनच की काय या अभ्यासक्रमाचा समावेश आता आंतरशास्त्रीय विद्याशाखेमध्ये करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्देशामुळे विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
१९९४ च्या विद्यापीठ कायद्यानुसार सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये नऊ विद्याशाखा होत्या. यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, विज्ञान, वाड्मय, सामाजिकशास्त्र, गृहविज्ञान, औषध, वाणिज्य, विज्ञान, विधी यांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र नव्या कायद्यात विद्याशाखांची संख्या चार इतकीच मर्यादित करण्यात आली आहे. यात विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यशास्त्रे आणि आंतरशास्त्रीय विद्याशाखा यांचा समावेश आहे. याअगोदर ‘फाईन आर्टस’ हा अभ्यासक्रम कला शाखेत समाविष्ट होता.
नागपूर विद्यापीठात हा विभाग १९८० पासून असून येथून अनेक रंगकर्मी व कलाकारांनी शिक्षण घेतले आहे. या विभागात नृत्य, ड्रामा, संगीत, चित्रकला, अप्लाईड आटर््स इत्यादी ‘स्पेशलायझेशन’ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विषय कलेशीच निगडित आहेत. नव्या नियमांनुसार कला शाखेशी संबंधित सर्व विषय मानव्यशास्त्र विद्याशाखेत समाविष्ट झाले आहे. त्यामुळे ‘फाईन आटर््स’ विभागाचा समावेशदेखील मानव्यशास्त्रमध्येच होणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने स्थापना केलेल्या डॉ. आर. एस. माळी यांच्या समितीने ‘फाईन आटर््स’चा समावेश आंतरशास्त्रीय
विद्याशाखेत केला आहे. यामुळे शिक्षणतज्ज्ञ तसेच शैक्षणिक-सांस्कृतिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही राज्य शासनाच्या निर्देशांचेच पालन करत असल्याचे स्पष्ट केले.