UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 10:39 AM2022-05-31T10:39:16+5:302022-05-31T16:10:30+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात विदर्भातील निकालाचा टक्का वाढला आहे.

Students from Vidarbha fly the flag in UPSC exams | UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

googlenewsNext
ठळक मुद्देतिघांनी दुसऱ्यांदा मिळविले यश : वर्ध्याच्या शुभमने पाच वेळा जिद्दीने दिली परीक्षा

नागपूर :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात विदर्भातील निकालाचा टक्का वाढला आहे. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून, यशाचा झेंडा फडकविला आहे. शुभम भैसारे (९७)(भंडारा), सुमित रामटेके (३५८) (यवतमाळ), शुभम नगराळे (५६८) (वर्धा), आकांक्षा तामगाडगे (५६२) यवतमाळ, विशाल खत्री (२३६) नागपूर अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. यापैकी शुभम भैसारे, सुमित रामटेके आणि शुभम नगराळे या तिघांनी यूपीएससीची परीक्षा दुसऱ्यांदा यशस्वी केली, हे विशेष.

गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यामुळे यूपीएससी, सीएसई २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

शुभमचे आयएएस व्हायचे स्वप्न पूर्ण झाले

शुभम भैसारे याला देशात ९७ वी रँक मिळाली आहे. त्याने आतापर्यंत चार वेळा यूपीएससीची परीक्षा दिली, दोन वेळा तो यशस्वी झाला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये तो यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता, तेव्हा ७४९ वी रँक मिळाली होती. तो सध्या इंडियन रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. आयएएस व्हायचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने तयारी केली आणि यंदा तो यशस्वीही ठरला. शुभम मूळचा भंडारा जिल्ह्यातील साकोलीचा राहणारा आहे. वडील न्यायाधीश असल्याने त्यांची नियमित बदली होत होती. परिणामी, शुभमचे शिक्षण वेगवेगळ्या जिल्ह्यात झाले. २०१७ मध्ये त्याने आयईएस परीक्षा उत्तीर्ण केली. जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहिले तर यश नक्कीच मिळते, याचे तो मूर्तिमंत उदाहरण असून, हाच संदेश त्याने इतर विद्यार्थ्यांसाठीही दिला आहे.

वर्ध्याच्या शुभम नगराळेला देशपातळीवर ५६८ वा रँक

शुभम नगराळे याला देशपातळीवर ५६८ वा रँक मिळाला. तो मूळचा वर्धा जिल्ह्यातील पुलगावचा आहे. दहावीपर्यंतचे त्याचे शिक्षण पुलगावमध्येच झाले. त्यानंतर हैदराबादमध्ये शिकला. आयआयटी खडगपूर येथून त्यांनी कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. त्याने आतापर्यंत पाच वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. दुसऱ्या अटेम्पमध्ये ते यशस्वी होऊन आयआरएस झाला, परंतु त्याला आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्याने पुन्हा परीक्षा दिली आणि तो यशस्वी झाला.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा सुमित होणार आयपीएस

सुमित रामटेके हा मूळचा यवतमाळचा राहणारा. वणी तालुक्यातील शिरपूर हे त्याचे गाव. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ८ वी ते दहावी त्याने वणीमध्ये केले. ११ वी १२ वी नागपूरमध्ये पूर्ण केले. आयआयटी वाराणसी येथूून इंजिनिअरिंग पूर्ण केली. २०१६ पासून त्याने यूपीएससीची तयारी केली. एकूण पाच वेळा त्याने ही परीक्षा दिली. त्याची आयपीएस व्हायची इच्छा होती.

२०१९ मध्ये तो यूपीएससी परीक्षा यशस्वी झाला. तेव्हा त्याला ७४८ वा रँक मिळाला होता. थोडक्यात, आयपीएस चुकले; परंतु त्याने हार मानली नाही. काही झाले तरी आयपीएस व्हायचेच या एकाच ध्येयाने तो पुन्हा तयारीला लागला. पुन्हा यूपीएससी उत्तीर्ण केली. त्याला देशपातळीवर ३५८ वा रँक मिळाला असून, आयपीएस व्हायचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

दुसऱ्या प्रयत्नात आकांक्षाची सरशी

यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील डॉ. आकांक्षा तामगाडगे हिने दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना ५६२वी रँकिंग मिळाली. तिने १२ वी पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथून पूर्ण केले. आई माधुरी व वडिल मिलिंद तामगाडगे हे दोघएही डॉक्टर आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेऊन पुणे येथे यूपीएससीची तयारी सुरू केली. मात्र, पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. कोरोना काळात आकांक्षाने घरी राहूनच पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. परिपूर्ण तयारी झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली.

नितीश डोमळे @ ५५९

गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथील पी. डी. रहांगडाले विद्यालयाचा माजी विद्यार्थी नितीश दिलीपकुमार डोमळे यानी यूपीएससी परीक्षेत ५५९ गुण घेऊन यश संपादन केले आहे. नितीशचे आई-वडील शिक्षक आहेत. वडील पी. डी. राहांगडाले विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना दिले आहे. 

आरटीओंचा मुलगा यूपीएससीत चमकला

यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात प्रभारी असलेले आरटीओ ज्ञानेश्वर हिरडे यांचा मुलगा अनिकेतने यूपीएससी परीक्षेत गगनभरारी घेतली आहे. रॅंकिंगमध्ये ९८व्या क्रमांकावर आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे घवघवीत यश मिळविले आहे. अनिकेत आयआयटी पवईचा विद्यार्थी असून, त्याने एमटेक केले आहे. काही दिवस खासगी नोकरी केली. नंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. कठोर मेहनत व परिश्रमाला फळ आले.

Web Title: Students from Vidarbha fly the flag in UPSC exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.