पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 11:14 PM2022-01-06T23:14:50+5:302022-01-06T23:15:02+5:30
भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते. हे टाळण्यासाठी नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमानुसार जिल्ह्यातील २ लाख, ७५ हजार विद्यार्थ्यांना पोलीस अपघात कसा टाळायचा, त्याचे धडे देणार आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण ९६९ रस्ते अपघात झाले असून, त्यामध्ये ४४५ अपघातांमध्ये ४६६ जण ठार झाले; तर ९०१ जण गंभीर
जखमी झाले होते. धडकी भरविणारी ही आकडेवारी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मगर यांनी जिल्ह्यात घडणारे अपघात टाळण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरू केला असून, १ जानेवारीपासून त्याला सुरुवात झाली आहे. २६ जानेवारीपर्यंत उपक्रमाचा पहिला टप्पा राहील. जिल्ह्यातील १ हजार शाळांंमध्ये पोलीस जातील आणि ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे देतील. अपघात कसे घडतात आणि अपघात कसे टाळायचे, त्यासंबंधीचे व्हिडीओ दाखवतील. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासोबतच त्यांनी गिरवलेले सुरक्षेचे धडे आई-वडील, भाऊ-बहीण यांनाही देण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
का घडतात अपघात?
गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत गतवर्षी रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन अपघातात सर्वाधिक बळी गेले आहेत. ग्रामीण भागात वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. ९० टक्के दुचाकीचालक हेल्मेट घालत नाहीत. वेगाने तसेच राँगसाईड वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अपघात होतात. सावनेर विभागात सर्वाधिक अपघात जिल्ह्यात सर्वाधिक अपघात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग असलेल्या सावनेर विभागात झाले आहेत. २२१ अपघातांत ९९ जणांचा मृत्यू आणि १८५ जण जखमी झाले आहेत. काटोल विभागात रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यामुळे १९४ अपघातांत ९० जण ठार, तर १८४ जण जखमी झाले. उमरेड विभागात १६१ अपघातांत ८७ जण ठार, तर १७७ जण जखमी झाले आहेत. कन्हान विभागात १४९ रस्ते अपघातात ६५ जण ठार, तर १३२ जण जखमी झाले आहेत; तर नागपूर विभागात १४८ रस्ते अपघातात ६२ जण ठार, तर १३ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद ग्रामीण पोलिसांकडे आहे.