वसतिगृहातील ‘त्या’ विद्यार्थ्यांना कुलगुरूंचा ‘अल्टिमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:40 PM2018-08-27T23:40:52+5:302018-08-27T23:42:02+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात नियमबाह्य पद्धतीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ‘अल्टिमेटम’च दिला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जर विद्यार्थ्यांनी खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर त्यांना थेट ‘रस्टिकेट’ करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे राहत असून त्यांच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात नियमबाह्य पद्धतीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ‘अल्टिमेटम’च दिला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जर विद्यार्थ्यांनी खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर त्यांना थेट ‘रस्टिकेट’ करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे राहत असून त्यांच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील वसतिगृहामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ११९ विद्यार्थ्यांची ही समस्या आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ३० एप्रिलला वसतिगृह रिकामे करावे, असे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले होते. मात्र काही जणांच्या परीक्षा बाकी असल्याने विद्यापीठाने ही मुदत १० जूनपर्यंत वाढविली. मात्र तरीदेखील विद्यार्थी निघाले नाहीत. त्यानंतर ही मुदत १० जुलैपर्यंत वाढविण्यात आली. तोपर्यंत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे वसतिगृहासाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे ११९ विद्यार्थ्यांनी १० आॅगस्टपर्यंत खोल्या रिकाम्या करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले. तरीदेखील विद्यार्थ्यांनी खोल्या सोडल्या नाहीत. अखेर नाईलाजाने विनापरवानगी राहणाºया विद्यार्थ्यांच्या खोल्यांना सुरक्षारक्षकांनी टाळे ठोकले.
या मुद्यावरुन विद्यार्थ्यांनी दोनदा विद्यापीठात आंदोलन केले. एकदा तर ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराला टाळेदेखील ठोकले.
सोमवारी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली व वसतिगृहात राहू देण्याची विनंती केली. मात्र कुलगुरूंनी ही विनंती फेटाळून लावली. एकदा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना वसतिगृहात राहिलेल्या विद्यार्थ्याला परत दुसºया पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर नियमानुसार लगेच वसतिगृह देता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा प्रथम वर्ष प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यानंतर जर काही जागा रिक्त राहिल्यास दुसºयांदा पदव्युत्तर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाईल, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ११९ विद्यार्थ्यांपैकी ८० जणांनी दुसरीकडे राहण्याची सोय केली आहे. मात्र इतर विद्यार्थ्यांनी अद्याप आपले सामान नेलेले नाही. या विद्यार्थ्यांनी मंगळवारपर्यंत खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर थेट ‘रस्टिकेट’च करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवे विद्यार्थी खोळंबले
दरम्यान, विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आटोपली असून, बाहेरील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. वसतिगृहाच्या खोल्यांचे या विद्यार्थ्यांना कागदोपत्री वाटप झाले आहे. मात्र जुन्या विद्यार्थ्यांनी अद्याप खोल्या रिकाम्या केल्या नसल्यामुळे नवीन विद्यार्थी तेथे राहायला जाऊ शकलेले नाहीत. जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा, असे कुलगुरूंनी सांगितले.
आता कशाला हवे वसतिगृह?
वसतिगृहात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांनी तर तिस ऱ्यांदा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. काही जण तर नोकरीदेखील करीत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काही जण तर कुठलेच विद्यार्थी नसतानादेखील तेथे राहत आहेत. अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह कशाला हवे व नव्यांना संधी मिळणार कधी, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला.