विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अवयवांचे कार्य : मेडिकलमध्ये अवयव प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:13 PM2020-02-25T23:13:10+5:302020-02-25T23:14:56+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) तीन दिवसीय अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी विविध शाळांच्या ६००वर विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

Students learned the function of organs: organ display in medical | विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अवयवांचे कार्य : मेडिकलमध्ये अवयव प्रदर्शन

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अवयवांचे कार्य : मेडिकलमध्ये अवयव प्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी ६००वर विद्यार्थ्यांनी दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरीरातील अवयवांविषयी प्रत्येकाला कुतूहल असते. अवयवांचे कार्य कसे चालते, प्रत्यक्ष दिसायला कसे असतात, याची उत्सुकता असते. याच उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) तीन दिवसीय अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी विविध शाळांच्या ६००वर विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. मंगळवारी याचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे आदी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मानवी शरीरातील अवयव जतन करून ठेवले जातात. ते अवयव सर्व सामान्य नागरिकांना पाहता यावेत, अवयवांची काळजी घेऊन आजारांना कसे दूर ठेवता यावे या विषयी जनजागृती व्हावी म्हणून मेडिकलतर्फे वर्षातून एकदा अवयवांचे प्रदर्शन भरविले जाते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मेडिकलच्या स्टुडंट कौन्सिलच्या मदतीने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात या प्रदर्शनाचे आयोजन केले.
प्रदर्शनात मेंदू, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, छोटी आतडी, मोठी आतडी, स्पायनल कॉड, स्वादूपिंड या शिवाय, कवटी, हाताचे-पायाच्या हाडासह इतरही भागातील हाड आदी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. हृदयाचे पम्पिंग कसे होते, मेंदूच्या कोणत्या भागात कोणत्या शरीराचे कार्य अवलंबून असते, फुुुुुफ्फुसाचे कार्य कसे चालते, लठ्ठ लोकांची चरबी यकृतात कशी जाते. यकृत निकामी होते म्हणजे काय होते, मूत्रपिंडाचे कार्य कसे चालते, त्याच्या आत काय असते, अशा अनेक गोष्टी वैद्यकीय विद्यार्थी शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात अवयव देऊन त्यांचा वैद्यकीय शिक्षणाशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्नही या निमित्ताने होत आहे.
विशेष म्हणजे, प्रदर्शनात भेट देण्याऱ्या विद्यार्थ्यांचे व लोकांच्या गर्दीचे मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे. प्रदर्शनाच्या आयोजनासाठी उपअधिष्ठाता डॉ. कुंभलकर, स्टुडंट कौन्सिलचे प्रमुख डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष सचिन भोसले, वैभव गरड, प्रणील वारुळकर, सुमया शेख, चैतन्य अग्रवाल आदी परिश्रम घेत आहेत.

प्रदर्शन २७ तारखेपर्यंत
मेडिकलमध्ये आयोजित हे अवयव प्रदर्शन २७ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. परंतु प्रत्येक सेशनची वेळ ठरलेली असल्याने त्या वेळेत विद्यार्थ्यांनी हजर राहण्याचे आवाहन केले आहे. पहिले सेशन सकाळी ९ ते दुपारी १२, दुसरे सेशन दुपारी १२ ते ३ तर तिसरे सेशन ३ ते ६ वाजेपर्यंतचे आहे.

दरवर्षी चार हजार विद्यार्थ्यांची भेट -डॉ. गावंडे
डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना आपल्या अवयवांची माहिती व्हावी, त्यांची काळजी घेतली जावी, हा अवयव प्रदशर््न मागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष अवयव हातात घेऊन वैद्यकीय विद्यार्थी ही माहिती देत असल्याने ते नेहमी स्मरणात राहते. गेल्या वर्षी या प्रदर्शनाला चार हजारावर विद्यार्थ्यांनी भेट दिली होती.

Web Title: Students learned the function of organs: organ display in medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.