विद्यार्थ्यांनी जाणून घेतला जिल्ह्याचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:24+5:302021-02-26T04:11:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत वेध प्रतिष्ठान, नागपूरतर्फे ‘ग्रेट भेट’ कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत वेध प्रतिष्ठान, नागपूरतर्फे ‘ग्रेट भेट’ कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुरतत्व व इतिहास संशाेधक डाॅ. मनाेहर नरांजे यांची ‘झूम वेबिनार’द्वारे मुलाखत घेत नागपूर जिल्ह्याचा इतिहास जाणून घेतला.
यात डाॅ. मनाेहर नरांजे यांनी सांगितले की, इतिहास हा भूगोलावर घडत असतो. काल्पनिक इतिहासाला महत्त्व न देता पुरातन वास्तू व पुरावे या आधारावर खरा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधु’ हा नागपूर जिल्ह्यात लिहिला गेला. ऐतिहासिक ‘नगरधन’सारखे समृद्ध व व्यापारी केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे. राजा बख्त बुलंदशहा यांनी ३०० वर्षांपूर्वी नागपूर शहर बसविलेले आहे. नागपूर जिल्ह्यात रामटेक, पारशिवनी, काटोल, नरखेड या भागात भरपूर पुरातन वास्तू आहे. खोदकामात बऱ्याच वस्तू सापडलेल्या आहेत. या वस्तूचे जतन करण्यासाठी ‘स्थानिक संग्रहालय’ निर्मिती शासन स्तरावर होणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्या पूर्वजांचा इतिहास भावी पिढीला कळेल, असेही ते म्हणाले.
वेधचे समन्वय धनंजय पकडे यांनी प्रास्ताविकातून या उपक्रम व कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. संचालन ग्रेट भेट उपक्रमाचे समन्वयक राजेंद्र टेकाडे यांनी केले, तर मारोती मुरके यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी वेधचे सचिव खुशाल कापसे, कमलेश सोनकुसळे, ओंकार पाटील, वीरेंद्र वाघमारे, एकनाथ खजुरिया, किशोर रोगे, भाऊराव जिभकाटे, शुभांगी कळंबे आदींनी सहकार्य केले.
इतिहासात विदर्भावर अन्याय
बालभारती, पुणेद्वारा पाठ्यपुस्तके तयार केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये विदर्भावर अन्याय केला जातो. पाठ्यपुस्तके मंडळाच्या सदस्यपदी पश्चिम महाराष्ट्रातील व्यक्तींचा भरणा अधिक असल्यामुळे विदर्भाचा इतिहास फक्त चवीपुरता असतो. विदर्भाला पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात लाभली असतानाही पाठ्यपुस्तकांमध्ये विदर्भ दुर्लक्षित आहे. यासाठी वैदर्भीय लेखकांनी स्थानिक विषयांवर लेखन करावे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र टेकाडे यांनी व्यक्त केली.