विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांची केली उधळण, रंगली सुरेल स्वरांची मैफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:08 AM2021-09-03T04:08:10+5:302021-09-03T04:08:10+5:30
- लोकमत कॅम्पस क्लब आंतरशालेय एकलगीत गायन स्पर्धा : एम.एच.जे. विद्यानिकेतन व एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूलचे आयोजन लोकमत न्यूज ...
- लोकमत कॅम्पस क्लब आंतरशालेय एकलगीत गायन स्पर्धा : एम.एच.जे. विद्यानिकेतन व एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूलचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब व मेजर हेमंत जकाते (एम.एच.जे.) विद्यानिकेतन ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने व व्हेन्यू पार्टनर एम.के.एच. संतेची पब्लिक स्कूलच्या सहकार्याने पार पडलेल्या आंतरशालेय एकलगीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांची उधळण केली. एकापेक्षा एक सरस गायन करत विद्यार्थ्यांनी स्पर्धा म्हणा वा संगीत मैफिल सुरेल स्वरांनी आणखीच रंगली.
ही स्पर्धा वर्ग ३ ते वर्ग ७ पर्यंतचा ‘अ’ गट आणि वर्ग ८ ते वर्ग १० पर्यंतचा ‘ब’ गट, अशा दोन गटात पार पडली. स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून दोन गटात केवळ एक-एक अशी एन्ट्री देण्यात आली होती. यात शहरातील सुमारे दोनशे शाळांनी सहभाग नोंदवला. साधारणत: सव्वा दोनशेंच्या वर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यासाठी विद्यार्थ्यांना ९० सेकंदाचा गायनाचा व्हिडिओ पाठवायचा होता. यातून दोन्ही गटात प्रत्येकी २० असे ४० विद्यार्थी अंतिम फेरिसाठी निवडण्यात आले होतेे. ही अंतिम फेरी एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड येथे १ सप्टेंबर रोजी पार पडली. या अंतिम फेरीत दोन्ही गटातील ४० विद्यार्थ्यांनी स्वरांची मनसोक्त उधळण करत परीक्षकांना आश्चर्यचकित केले. स्पर्धा म्हणून संगीताची ही मैफिल अतिशय अटीतटीची ठरली आणि एक संगीत मैफिल म्हणून उपस्थित श्रोतृवृंद आनंदी झाला. स्पर्धक विद्यार्थ्यांना गायनात की-बोर्डवर मंगेश पटले तर तबल्यावर कुणाल दहेकर यांनी साथसंगत केली. परीक्षक म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या शिक्षिका व हरिहर संगीत अकादमीच्या संचालिका पुष्पा उईके व गायिका ज्योती विलास बनकर यांनी जबाबदारी पार पाडली. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक मधुसूदन मुडे, मेजर हेमंत जकाते ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका पल्लवी लाडे, प्रेरणा डेअरीचे संचालक रविप्रकाश कोरडे, एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बिंदू जोसेफ उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्तेच स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
--------------
आंतरशालेय एकल गीत गायन स्पर्धेतील विजेते
‘अ’ गट
प्रथम - अनुश्री केळकर (भारतीय कृष्ण विद्या विहार)
द्वितिय - सावी तेलंग (एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूल, बेसा)
तृतीय - गौरी सातपुते (सेवा सदन सक्षम स्कूल)
प्रोत्साहन - आस्था पाटील (सुयश काॅन्व्हेंट)
प्रोत्साहन - सानिका टाकळखेडे (हडस प्रायमरी स्कूल)
‘ब’ गट
प्रथम - सिया जेम्स (माँट फोर्ट स्कूल)
द्वितीय - श्रावणी बुजोवणे (आर.एस. मुंडले इंग्लिक स्कूल)
तृतीय - आदित्य बडगे (श्री सत्यसाई कॉन्व्हेंट)
प्रोत्साहन - नयन मेश्राम (दयानंद आर्य कन्या विद्यालय)
प्रोत्साहन - आर्या कोरडे (सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूल)
..................