विद्यार्थ्यांनाे, आज ‘नीट’ वेळेत पाेहोचा; २० हजारांवर विद्यार्थी देणार पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2023 07:00 AM2023-05-07T07:00:00+5:302023-05-07T07:00:02+5:30
Nagpur News वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात येणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम् एंट्रन्स टेस्ट-२०२३’ (नीट) परीक्षा रविवारी हाेत आहे.
नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात येणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम् एंट्रन्स टेस्ट-२०२३’ (नीट) परीक्षा रविवारी हाेत आहे. दुपारी २ पासून परीक्षा सुरू हाेणार आहे. सकाळी ११ पासून रिपाेर्टिंगचा वेळ देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या किमान एक तासअगाेदर उपस्थित व्हायचे आहे. काेणताही अनुचित प्रकार हाेऊ नये म्हणून वेळ आणि ड्रेस काेडचे पालन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे.
एनटीएद्वारे ३० एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी परीक्षा केंद्राच्या शहरांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय ३ मे पासून प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहे. काॅपीसारखा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्यार्थ्यांना ड्रेस काेड लागू करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर त्यासाठी कठाेर झाडाझडती घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची धावपळ हाेऊ नये म्हणून सकाळी ११ पासून दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्हा आणि आसपासच्या क्षेत्रातील २० ते २५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहतील. सकाळी ११ पासून बाेलाविल्याने विद्यार्थी व पालकांद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र विद्यार्थी संख्या बघता, तपासणीला वेळ लागणार असल्याने सकाळपासून बाेलाविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय परीक्षा केंद्राबाबत संभ्रम निर्माण झाला, तर विद्यार्थ्यांना सावरायला वेळ मिळावा, असाही त्यामागचा उद्देश असल्याचे बाेलले जात आहे.
विद्यार्थ्यांना ड्रेसकाेड
- विद्यार्थ्यांनी फिक्कट रंगाचा व हाफ बाह्याचा शर्ट परिधान करावा. फूल शर्ट टाळावा.
- विद्यार्थिनींनी साधा सलवार सूट किंवा टी-शर्ट वापरावा. त्यावर ब्रुच, रंगबिरंगी फुले नकाेत.
- कानात काेणत्याही प्रकारच्या रिंगा, बाेटात अंगठी, बांगड्या किंवा काेणताही दागिना परिधान करू नये.
- शक्यताे सॅन्डल्स किंवा स्लीपरवरच यावे. शूज वापरू नयेत. वैद्यकीय त्रास असेल तरच शूज घालता येईल. पण तसे वैद्यकीय प्रमाणपत्र साेबत असावे.
काय आणू नये?
- माेबाईल फाेन, पेजर, कॅल्क्युलेटर, स्मार्टवाॅच अशा इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंना सक्त मनाई.
- वॉलेट, पर्स, हॅन्डबॅग्ज किंवा तसे इतर साहित्य आणू नये.
- खाद्यपदार्थ किंवा पेयपदार्थ साेबत आणू नयेत.
- पेन, पेन्सील, खाेडरबर आदी स्टेशनरी साहित्य साेबत आणू नये. ते केंद्रावर पुरविले जाईल.
हे साेबत घ्यावे
- विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र आणि आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र साेबत ठेवावे.
- एका पारदर्शक बॅगमध्ये मास्क आणि सॅनिटायझर बाॅटल आणावी.
- काेणतीही वैद्यकीय समस्या असल्यास तसे वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र साेबत आणावे.
- दिलेल्या ड्रेसकाेडसह किमान तासभर आधी परीक्षा केंद्रावर पाेहोचावे.