मतदानासाठी विद्यार्थी करणार पालकांना प्रेरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:08 AM2019-10-01T00:08:53+5:302019-10-01T00:09:33+5:30
मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे.
लोकशाहीत मतदान हे महत्त्वाचे आहे. मतदानाच्या बाबतीतदेखील लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपली लोकशाही अधिक सक्षम होणार नाही. लोकशाहीच्या मजबुती करण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अॅन्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’(स्विप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहर-ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेत, त्यांना पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
राज्यात सध्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये राज्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही सरासरीपेक्षा खालावत चालली असल्याचे चित्र आहे. ही मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावावा. यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पालक मतदान करतील. असे संकल्पपत्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याअंतर्गत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांकडून त्यांचे पालक आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील असे संकल्पपत्र भरून घेतील. शहर-जिल्ह्यात सरकारी व खासगी माध्यमांच्या सुमारे तीन हजारांवर शाळा असून, येथे अडीच लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांकडून हे संकल्पपत्र भरून घेत, त्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. व्हीपसाठी ग्रामीण भागात नोडल अधिकारी म्हणून जि.प.च्या पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ राजेंद्र भुयार यांची नेमणूक केली आहे. तर शहरी भागासाठी मनपाच्या उपायुक्त रंजना लाडे यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील आठवडाभरात शाळांना विद्यार्थ्यांकडून हे संकल्पपत्र भरून घेत सदरचा अहवाल शिक्षण विभागाच्या माध्यमातून नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे.
असे आहे संकल्प पत्र
या संकल्पपत्रात विद्यार्थ्याला आपले नाव, वर्ग, शाळा लिहायची आहे. याद्वारे ‘संकल्प करतो की, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये माझे पालकांना मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याकरिता प्रवृत्त करील तसेच माझे परिसरातील अन्य व्यक्तींनादेखील मतदान करण्याकरिता प्रवृत्त करीन, असा संकल्प करीत आहे.