तुटपुंज्या इंटर्नशीप भत्त्याविरोधात ‘माफसू’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; सरकारच्या धोरणाविषयी नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 10:56 AM2022-03-09T10:56:12+5:302022-03-09T10:58:30+5:30
राज्य शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी वाढीव ‘इंटर्नशीप’ भत्त्याच्या मागणीसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय व चिकित्सालयासमोर आंदोलन केले. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अतिशय तुटपुंजे मानधन आहे. सातत्याने मागणी करूनदेखील राज्य शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या नियमानुसार पशुवैद्यकीय पदवी नवीन अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एक वर्षाची ‘इंटर्नशीप’ करणे (सहा महिने राज्यात व सहा महिने राज्याबाहेर) अनिवार्य आहे. केंद्रीय पशुपालन व मत्स्यपालन राज्यमंत्री संजीवकुमार बलयान यांनी १५ हजार ‘इंटर्नशीप’ भत्त्याच्या घोषणेची अद्यापही पूर्तता झालेली नाही. इंटर्नशीपसाठी विविध विविध शहरात जावे लागते व तेथे केवळ साडेसात हजाराच्या भत्त्यात काहीच भागत नाही.
अनेक ठिकाणी त्यांच्याकडून राहण्यासाठीच अव्वाच्यासव्वा रक्कम मागण्यात येत आहे. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असून, त्यांच्यासाठी ‘इंटर्नशीप’साठी निधीची तजवीज करणे कठीण झाले आहे. दुसरीकडे राजस्थान, हरियाणा, बिहार येथील विद्यार्थ्यांना १५ ते १६ हजाराचे मानधन दिले जाते. राज्य शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पशुवैद्यकीय महाविद्यालय व चिकित्सालयासमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली व लवकरात लवकर ‘इंटर्नशीप’ भत्ता वाढवावा, अशी मागणी केली.