गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांचे छायाचित्र?
By Admin | Published: October 25, 2014 02:41 AM2014-10-25T02:41:17+5:302014-10-25T02:41:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकांवर काही कालावधीने विद्यार्थ्यांची छायाचित्रे दिसली तर आश्चर्य व्यक्त करू नका.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकांवर काही कालावधीने विद्यार्थ्यांची छायाचित्रे दिसली तर आश्चर्य व्यक्त करू नका. विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भातील सूचना देशभरातील विद्यापीठांना केली आहे.
यासंदर्भात निर्णय काय घ्यावा हे विद्यापीठांवर सोपविले असले तरी या ‘हायटेक’ गुणपत्रिकेमुळे ‘बोगस’ प्रकरणांवर नक्कीच नियंत्रण आणणे शक्य होऊ शकणार आहे.
मुंबई विद्यापीठाने २०१० साली तब्बल ६२७ बोगस गुणपत्रिका पकडल्या होत्या. त्या गुणपत्रिका विविध पातळ्यांवर करण्यात आलेल्या छाननीत लक्षात आल्या होत्या. त्यामुळे बोगस गुणपत्रिका तयार करण्याचे रॅकेटच असल्याचा संशय येऊन त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुंबईत होणारे प्रकार टाळण्यासाठीच गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे रंगीत छायाचित्र प्रकाशित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांनी त्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाचे चेअरमन प्रा. वेदप्रकाश यांना पत्र पाठवले होते. त्यात मुंबई विद्यापीठाने गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे रंगीत छायाचित्र प्रकाशित करण्याच्या प्रयोगाचा उल्लेख केला आहे. ‘बोगस’ गुणपत्रिकांचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठाने सुरू केलेला हा पायंडा देशभरातील इतरही विद्यापीठांमध्ये लागू करावा, अशी शिफारस देसाई यांनी केली.
या सूचनांचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे चेअरमन प्रा. वेदप्रकाश यांनी स्वागतच केले. तसेच यूजीसीचे सचिव प्रो. जसपाल संधू यांनी तातडीने सर्वच विद्यापीठांना गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांची छायाचित्रे लावण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना केली आहे.(प्रतिनिधी)