नागपूरच्या आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्याचे रँगिंग : आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:36 PM2018-02-28T23:36:42+5:302018-02-28T23:37:00+5:30
अजनी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात आयुर्वेदिक शाखेच्या विद्यार्थ्याची रँगिंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या अंगावर लघवी करणे आणि विष पाजण्यात आल्याचा आरोप आहे. अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पीडित विद्यार्थ्याचे बयान घेतल्यानंतर आठ विद्यार्थ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे अजनी पोलिसात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात आयुर्वेदिक शाखेच्या विद्यार्थ्याची रँगिंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या अंगावर लघवी करणे आणि विष पाजण्यात आल्याचा आरोप आहे. अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पीडित विद्यार्थ्याचे बयान घेतल्यानंतर आठ विद्यार्थ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे अजनी पोलिसात खळबळ उडाली आहे.
चंद्रमणीनगर येथे शासकीय आदिवासी वसतिगृह आहे. येथे आदिवासी समाजातील मेडिकल व इंजिनियरिंगचे विद्यार्थी राहतात. परभणी येथील विष्णू पवार असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. रँगिंगची घटना ही २१ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. विष्णूनुसार आरोपी विद्यार्थी त्याला अनेक दिवसांपासून त्रास देत होते. मारहाणही करीत होते. २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्याच्या शरीरावर लघवी करून फिनाईलमध्ये विष टाकून त्याला बळजबरीने पाजले. प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले.
आरोपी विद्यार्थी मात्र रँगिग केल्याचे नाकारत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, विष्णू चार-पाच महिन्यांपूर्वीच हॉस्टेलमध्ये आला. बहुतांश विद्यार्थी रात्री ९ वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये येऊन जातात. मेडिकलचे विद्यार्थी मात्र इंटर्नशिप किंवा आपात्कालीन सेवेमुळे रात्री उशिरा येतात. विष्णूही अनेकदा उशिरा येत होता. २२ तारखेला रात्री १२.१५ वाजता विष्णू बाल्कनीमध्ये कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये पांढऱ्या रंगाचे रसायन टाकून पित होता. प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी
वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. यामुळे नेमके काय घडले, याची माहिती मिळू शकते. चंद्रमणीनगरातील वसतिगृह अनेक दिवसांपासून आहे. येथील अनेक विद्यार्थी मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून शिकण्यासाठी येतात. येथून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी शासकीय विभागात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. घटनेची माहिती होताच तेही घटनास्थळी धावून आले होते.
आॅडियो क्लिपींगही केली तयार
विष्णूने आॅडियो क्लिपींग तयार करून त्याला चार-पाच विद्यार्थ्यांनी मारहाण केल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले आहे. ही क्लिपींग त्याने वसतिगृहातील व्हॉट्सअॅप ग्रुपवरही पाठवली आहे. पोलीस या क्लिपींगचीही तपासणी करीत आहे.
पोलिसांचा दबाव, पवार कुटुंब दहशतीत
मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहात रॅगिंग घेणाऱ्या आरोपीची एक नातेवाईक पोलीस विभागात कार्यरत आहे. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी ती महिला धडपड करीत होती. विष्णूच्या वृद्ध आईवडिलांनाही तिने दमदाटी केल्याची माहिती आहे. ती महिला बुधवारी सकाळी वसतिगृहातही उपस्थित होती. मात्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसताच तिने काढता पाय घेतला. तिच्या दबावामुळेच अजनी पोलीस बयान बदलण्यासाठी विष्णू व त्याच्या आईवडिलांवर दबाव टाकत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पवार कुटुंब बुधवारी दिवसभर दहशतीच्या सावटाखाली होते. पोलिसांचा बयान बदलविण्यासाठी वाढत्या दबावामुळे विष्णूसुद्धा घाबरला होता. वडील भारत पवार आणि आई मीना यांचीसुद्धा भेदरलेली अवस्था होती. शेवटी प्रसारमाध्यमांच्या रेट्यामुळे अजनी पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेता, विष्णूने दिलेल्या बयानावरून गुन्हा दाखल केला. विष्णूचे वडील भारत पवार यांनी आम्हाला न्याय द्या, अशी याचना केली.