युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठात सामावून घेता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 10:06 PM2022-03-28T22:06:14+5:302022-03-28T22:06:47+5:30

Nagpur News युद्धाच्या परिस्थितीनंतर, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेता येणार नाही, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) कुलगुरू व लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली.

Students returning from Ukraine cannot be accommodated in a health university | युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठात सामावून घेता येणार नाही

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठात सामावून घेता येणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही देशातील अभ्यासक्रम अनेक पॅरामीटर्सवर पूर्णपणे भिन्न

नागपूर : युद्धाच्या परिस्थितीनंतर, आम्ही युक्रेन विद्यापीठांमधील वैद्यकीय अभ्यासक्रमाचा अभ्यास केला असता, आमच्या आणि त्यांच्या अभ्यासक्रमात समानता नसल्याचे दिसून आले. दोन्ही देशातील हा अभ्यासक्रम अनेक मापदंडावर पूर्णपणे भिन्न आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेता येणार नाही, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) कुलगुरू व लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या सहभागी होण्यासाठी सोमवारी पहिल्यांदाच नागपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. कानिटकर म्हणाल्या, भारतातील व युक्रेनमधील एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये बराच फरक आहे. युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शास्त्राच्या काही मूलभूत मुद्द्यांसह युक्रेन देशाचा इतिहास, भूगोल आणि त्यांच्या भाषांबद्दल शिकवल्या जाते. युक्रेनमधून महाराष्टÑात परतलेल्या पहिल्या व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना येथील एमबीबीएससाठी प्रवेशासाठी पुन्हा प्रवेशप्रक्रियेची परीक्षा द्यावी लागेल. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आॅनलाइन मॉड्यूल’ सुरू करण्याचा विचार आहे. यामुळे त्यांचे शिक्षण चालू राहिल. परंतु त्यांना युक्रेनमध्येच परीक्षा द्यावी लागेल. याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच इतर अधिकाºयांना दिली आहे. त्यांच्याकडून काही बदल झाल्यास आम्ही त्याचे पालन करू.

-परीक्षा पुढे ढकलणार नाही

डॉ. कानिटकर म्हणाल्या, कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन निवासी डॉक्टरांना ‘थीसिस सबमिशन’सारख्या विषयांवर सूट दिली आहे. या शिवाय १ एप्रिलपासून परीक्षेसाठी रजाही देण्यात आली आहे. यामुळे आता कोणतीही परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही.

-कुलगुरू कट्टा सुरू करणार

विद्यापीठाचा व विद्यार्थ्यांशी संवाद वाढावा, यातून समस्या निकाली निघाव्या यासाठी ‘कुलगुरु कट्टा’ हे आॅनलाईन व्यासपीठ सुरू केले जाईल. या शिवाय, टेलिमेडिसिन व ‘आॅनलाईन लेक्चर फॉरमॅट’ला प्रोत्साहन देण्यात येईल, असेही डॉ. कानिटकर म्हणाल्या.

Web Title: Students returning from Ukraine cannot be accommodated in a health university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.