शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी बनतील छात्र पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:00 AM2018-10-30T00:00:24+5:302018-10-30T00:02:03+5:30

उपराजधानीत जबाबदार तरुण घडवायचे आहेत. विद्यार्थीदशेतील मुलांना सतर्क बनवून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवायचे आहे. समाजात काय वाईट, काय चांगले आहे, त्याची त्यांना किशोरवयातूनच ओळख व्हावी. पोलीस आपले मित्र आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये रुजावी आणि विद्यार्थी पोलिसांशी जुळावेत, या संकल्पनेतून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘छात्र पोलीस’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासंबंधाने सदरमधील एन कॉप्स अ‍ॅक्सीलन्स सेंटरमध्ये सोमवारी बैठक पार पडली.

Students of school and college students become students | शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी बनतील छात्र पोलीस

शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी बनतील छात्र पोलीस

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर शहर पोलिसांचा अभिनव उपक्रम : काय चांगले, काय वाईट, विद्यार्थ्यांना मिळणार धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत जबाबदार तरुण घडवायचे आहेत. विद्यार्थीदशेतील मुलांना सतर्क बनवून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवायचे आहे. समाजात काय वाईट, काय चांगले आहे, त्याची त्यांना किशोरवयातूनच ओळख व्हावी. पोलीस आपले मित्र आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये रुजावी आणि विद्यार्थीपोलिसांशी जुळावेत, या संकल्पनेतून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘छात्र पोलीस’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासंबंधाने सदरमधील एन कॉप्स अ‍ॅक्सीलन्स सेंटरमध्ये सोमवारी बैठक पार पडली.
बैठकीला सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, शहरातील सर्व पोलीस उपायुक्त, ठाणेदार तसेच १० शाळा अणि १० महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच प्राचार्य, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी संध्या मलपट्टीवार, मैत्री परिवाराचे चंदू पेंडके आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करताना डॉ. उपाध्याय म्हणाले, फक्त अशिक्षित तसेच गरीब वर्गातील मंडळीच गुन्हेगारीकडे वळतात असा पूर्वी समज होता. अलीकडे विचार केल्यास उच्चभू्र आणि उच्चशिक्षित मंडळीसुद्धा गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे दिसून येते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे दरवर्षी भारतात एक लाखापेक्षा जास्त लोकांचा अपघाती मृत्यू होतो. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी अमली पदार्थाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत. देशासमोर दहशतवादाचा गंभीर प्रश्न आहे. या सर्व मुद्यांची जाणीव शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून छात्र पोलीस ही संकल्पना पुढे आणल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. कारागृहात असलेल्यांपैकी फारच कमी गुन्हेगार जाणीवपूर्वक गुन्हेगारीत सक्रिय असतात. सुमारे ९५ टक्के गुन्हेगार अपघाताने गुन्हेगार बनलेले असतात, असे आपल्या निदर्शनास आले आहे. गुन्हे घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हा घडूच नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवे. प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलीसच आहे. ही संकल्पना विद्यार्थीदशेपासून मुलांच्या मनात रुजल्यास भविष्यात गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी फारच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. त्यामुळेच छात्र पोलीस हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रारंभी प्रस्तावना केली तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन परिमंडळ ३ चे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले.

प्रायोगिक तत्वावर सुरुवात
या उपक्रमाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी प्रारंभी १० शाळा अणि १० महाविद्यालयांना सहभागी करून घेण्यात आले आहे. संबंधीत पोलीस ठाण्यातील अधिकारी महिन्यातून दोनदा शाळा, महाविद्यालयात भेट देतील. तेथील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील. त्यांच्या समस्या, जाणून घेतील आणि संबंधित विषयाच्या संबंधाने त्यांना मार्गदर्शन करतील. त्यांना स्पर्धा परिक्षा, नोकरीसंदर्भातदेखिल मार्गदर्शन करण्यात येईल. आवश्यकतेनुसार, या उपक्रमात वेळोवेळी दुरूस्ती केली जाईल.

 

 

Web Title: Students of school and college students become students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.